Lockdown: पनवेलमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन; महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:26 AM2020-07-03T02:26:45+5:302020-07-03T02:26:58+5:30
औद्योगिक वसाहतीतील ज्या उद्योगांना उद्योग सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अथवा राज्य सरकारच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे, असे उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत.
पनवेल : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नवी मुंबईसह पनवेल महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पनवेलमध्ये आज रात्री ९ वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १४ जुलैपर्यंत सकाळी ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ २ किमीपर्यंत जाण्याची मुभा असणार आहे. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिका आणि ग्रामीण भागात हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस पुरेल इतक्या अत्यावश्यक सामानाचा साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. या लॉकडाऊनदरम्यान रुग्णालये तसेच औषधांची दुकाने, रुग्णवाहिका सुरू राहणार आहेत. याव्यतिरिक्त खाजगी प्रवासी वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आॅनलाइन पद्धतीने मद्यविक्री सुरू राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने, कार्यक्रम, कार्यशाळा, गोदामे आदींसह सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पीठ, डाळ, तांदूळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, चारा इत्यादींसह अत्यावश्यक यंत्रणेत गुंतलेले उत्पादन युनिट्स सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे.
औद्योगिक वसाहतीतील ज्या उद्योगांना उद्योग सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अथवा राज्य सरकारच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे, असे उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका