सिकंदर अनवारे दासगाव : माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आंबेत पुलाच्या बेअरिंगच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याने हा पूल पुढील तीन महिने बंद राहण्याची शक्यता आहे. सावित्री पूल दुर्घटनेनंतर तिन्ही पुलांची तपासणी करण्यात आली होती. तपासणीमध्ये पुलांची दुरुस्ती करण्याचे सुचविण्यात आले होते. आंबेत आणि टोळ या दोन्ही पुलांचे बेअरिंग बदलण्यासाठी पूल उचलले जाणार आहेत. यामुळे आंबेत पूल पुढील तीन महिने वाहतुकीसाठी पूर्ण वेळ बंद राहणार आहे.
महाडजवळील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेनंतर शासनाने सर्व जुन्या पुलांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक १९८० मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगावमधील आंबेत पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये टोळ, आंबेत आणि दादली या पुलांच्या पाण्याखालील पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे एजन्सीने सुचविले. त्यानुसार पुलांची दुरुस्ती करण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.
आंबेत पुलाकरिता साडेनऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तिन्ही पुलांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सावित्री नदीवरील मोठे पूल आहेत; शिवाय हे तिन्ही पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारे आहेत. यामुळे या पुलांना विशेष महत्त्व आहे. पुलांवरून सातत्याने अवजड वाहनांची आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असल्याने याची दुरुस्ती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम त्वरित सुरू केले आहे.
आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती केली जात असून, यादरम्यान या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही सर्व वाहतूक महाडमार्गे वळविण्यात आली आहे. आंबेत पुलाच्या पुलाखालील भागात दुरुस्ती केली जात आहे. पाण्याखाली असलेल्या पायाचे काँक्रिट काढून पुन्हा आधुनिक पद्धतीचे काँक्रिट लावले जात आहे. आंबेत पुलाच्या बेअरिंगदेखील नादुरुस्त झाल्या आहेत. बेअरिंगच्या दुरुस्तीसाठी पुलाचे भाग उचलावे लागणार आहेत. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे. हे काम पुढील काही दिवसांत सुरू होत आहे. बेअरिंगकरिता पुलाचे भाग उचलले जाणार आहेत. यादरम्यान पुलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पूल वाहतुकीस बंद केला जाणार असल्याचा फलक लावला आहे. किमान तीन महिने हा पूल बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.बंदर विकासकडून निधी अपेक्षित1) आंबेत पूल दुरुस्तीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे गोरेगाव आंबेत, दापोली, हरिहरेश्वर आदी ठिकाणची वाहतूक बंद आहे.2)स्थानिक रहिवाशांची छोटी वाहने मात्र सुरू ठेवण्यात आली होती. पुढील काही महिन्यांसाठी पूल कायम बंद ठेवण्यात आल्यास आंबेत, महाप्रळ यांसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या जवळपास पन्नास गावांचा प्रश्न निर्माण होणार आहे.3)सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदर विकास विभागाला स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून निधीची तरतूद केली आहे. पुलाचे काम सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर बंदर विकास विभाग काय पाऊल उचलते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष आहे.