अलिबाग : ग्रामीण भागातील जनसामान्यांना आर्थिक वा अन्य अडचणींच्या कारणास्तव न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचता येत नाही. परिणामी, त्यांना न्यायापासून वंचित राहावे लागते, अशी परिस्थिती राहू नये, याकरिता मुंबई उच्च न्यायालय विधि सेवा समितीच्या आदेशान्वये रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने येत्या ७ ते २५ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना अमलात आणण्यात येणार आहे. या संकल्पनेंतर्गत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोक अदालत गावागावांत पोहोचणार आहे.
‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोक अदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून तर अॅड. एम. एम. गुंजाळ यांची वकील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार, ७ जानेवारी रोजी येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रमुख जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता या फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता धोकवडे ग्रामपंचायत येथे हे फिरते लोक न्यायालय पोहोचणार असून, तेथे या ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रलंबित दिवाणी, फौजदारी प्रकरणे व पोलीस ठाण्यातील वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणारआहेत. पुढील काळात हे फिरते न्यायालय जिल्ह्यातील मुरुड, रोहा, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, पाली, माणगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यात जाऊन कामकाज करणार आहे. या संधीचा लाभ ग्रामस्थ-नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.