Lok Sabha Election 2019: 'या' मतदारसंघात महिला ठरवणार खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:17 PM2019-03-12T23:17:29+5:302019-03-13T07:11:09+5:30
८ लाख ३४ हजार ७६६ महिला; रायगडमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या अंतिम मतदार यादीनुसार रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या १६ लाख ३७ हजार ८३९ असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ३ हजार ७२ आहे. महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा ३१ हजार ६९४ ने अधिक म्हणजे ८ लाख ३४ हजार ७६६ आहे. परिणामी यंदाचा खासदार या मतदार संघातील महिला ठरवणार असे चित्र आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात १ लाख ४३ हजार ६५० पुरुष तर १ लाख ४५ हजार १२१ महिला मतदार आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात १ लाख २४ हजार ६९१ पुरुष तर १लाख २९ हजार ६९० महिला मतदार आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात १ लाख ४० हजार ८७९ पुरुष तर १ लाख ४१ हजार ५७२ महिला मतदार आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात १ लाख ३१ हजार ५२१ पुरुष तर १ लाख ४४ हजार ९०२ महिला मतदार आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघात १ लाख ११ हजार ८८९ पुरुष तर १ लाख २६ हजार ५३ महिला मतदार आहेत. केवळ पेण विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार संख्या महिला मतदारांपेक्षा अधिक असून येथे १ लाख ४७ हजार ४२८ महिला तर १ लाख ५० हजार ४४२ पुरुष मतदार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात २ हजार ६९३ मतदान केंदे्र राहाणार असून, त्यापैकी १ हजार ९३९ ग्रामीण तर ७५४ शहरी भागात राहाणार आहेत. २४ मतदान केंद्रे संवेदनशील असून तेथे विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.