निखिल म्हात्रे, अलिबाग : संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या रायगड लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालास महिनाभराचा अवधी असला तरी मतदानाची आकडेवारी व तज्ज्ञांची मते जाणून घेऊन निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. निवडून कोण येणार, यावरून गावोगावी पैजा लागल्या आहेत. यात नागरिकांसह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
महायुतीचे खासदार सुनिल तटकरे, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात जोरदार लढत झाली. त्यामुळे यंदाची रायगड लोकसभा निवडून राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजली. एकास एक लढतीचे चित्र बदलून ही निवडणूक तिरंगी होईपर्यंत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. देशातील, राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, पदयात्रांच्या माध्यमातून रान पेटविले. मतदानाची प्रक्रिया मंगळवारी पार पडल्यानंतर रात्रीपासून निकालाचे अंदाज व्यक्त होऊ लागले.
विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून कानोसा घेत रायगड लोकसभेचा एकत्रित अंदाज बांधला जात आहे. अंदाज आल्यानंतर पैजा लावण्यास सुरुवात झाली. निकालानंतर पैजेचा फैसलाही लागणार आहे. त्यामुळे पैजा लावणारे अन् न लावणारेही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.असा लावला जातोय अंदाज -
विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान, मागील मतदानाची तुलना, आकडेवारीबाबत तज्ज्ञांचे मताच्या आधारे निकालाचा अंदाज बांधला जात आहे. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून कानोसा घेत तसेच कोणता गट कोणासोबत राहिला या आधारेही अंदाज मांडला गेला. काहींनी ज्योतिषाच्या आधारेही अंदाज व्यक्त केला आहे. त्याआधारे पैजा लावल्या आहेत.पाच हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंत पैजा - निकालाबाबत पाच हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंतच्या पैजा लागल्या आहेत. पैजा लावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांपासून राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व्या पदाधिकारी, व्यावसायिक, उद्योजक यांचा समावेश आहे.