लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल
By वैभव गायकर | Published: May 11, 2024 12:40 AM2024-05-11T00:40:55+5:302024-05-11T00:42:00+5:30
व्हायरल झालेल्या मेसेजमुळे परिसरात झाला होता गोंधळ
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे, ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजावावा अशा स्वरूपाचा मेसेज पनवेल महानगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी चिपळेकर यांना दि.10 रोजी सायंकाळी 5 वाजता प्राप्त झाला होता.
संबंधित मेसेज विनया प्रसाद बहुलीकर 9881235349 यांच्या नावासह व्हायरल होत होता.मावळ लोकसभा मतदार संघासाठी दि.13 रोजी मतदान होणार असताना अशा प्रकारच्या मॅसेज बद्दल तक्रारदार शिवाजी चिपळेकर यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे विचारणा केली असता सदरील मेसेज हा अफवा असल्याचे तक्रारदार यांना समजल्यांने त्याबाबत तक्रारदार यांनी अनोळखी इसम यांच्या विरूध्द भादवि कलम ५०५ (१) प्रमाणे तकार दाखल केली आहे.