अलिबाग : रायगड जिल्ह्यात काँग्रेस, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात असलेली पूर्वीची भांडण मिटली असून इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते हे मोठ्या फरकाने विजयी होतील. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा निवडून येतील असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे.
रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, भावना पाटील, ऍड आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी पेझारी येथील ना ना पाटील हायस्कूल येथील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी इंडिया आघाडी ही राज्यात आघाडीवर राहील असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ही पाटील यांनी जनतेला केले आहे.
इंडिया आघाडी मध्ये २८ पक्ष असून प्रागतिक पक्षाचाही समावेश आहे. इंडिया आघाडीत कुठेही फूट पडली नाही. काही ठिकाणी वाद झाले ते मिटविण्यात आले आहेत. नाशिक येथे कॉम्रेड गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तो काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा येतील असा विश्वास आमदार पाटील यांनी बोलून दाखवला आहे.