कल्हे गावातील स्मशानभुमीत विजेची व्यवस्था; कर्नाळा ग्रामपंचायती मार्फत अखेर उपाययोजना
By वैभव गायकर | Published: January 17, 2024 04:02 PM2024-01-17T16:02:11+5:302024-01-17T16:03:01+5:30
लोकमत इम्पॅक्ट: याबाबत ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील कल्हे गावात दि.7 रोजी स्मशानभूमीत पुरेशी रोषणाई नसल्याने ग्राममस्थांना मोबाईलच्या टॉर्चवर अंत्यविधी पार पाडन्याची नामुष्की ओढवली.
कल्हे गावात मोहिनी चव्हाण (60) यांचे दि.7 जानेवारी रोजी निधन झाले.अंत्यविधीची वेळ रात्रीची असल्याने सर्व ग्रामस्थ स्मशानभूमीत गेल्यावर स्मशानभूमीत पूर्णपणे अंधार असल्याने ग्रामस्थांनी मोबाईलचे टॉर्च सुरु करून अंत्यविधी पार पाडले.याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.मृतदेह ठेवण्यासाठी असलेले सरण सोडले तर सर्व अत्यव्यस्थ झालेले आहे.मृत मोहिनी चव्हाण यांचे पुत्र मोहन चव्हाण यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.आमच्या बाबतीत झालेल्या या प्रसंगाची पुनरावृत्ती नको म्हणून शासनाने याबाबत पाऊले उचलावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.याबाबत कर्नाळा ग्रामपंचायतीने दि.17 रोजी स्मशानभूमीत विजेची व्यवस्था केली आहे.याबाबत ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.