लोकमत न्यूज नेटवर्कजलयुक्त शिवारच्या कामात मजुरांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:33 AM2018-07-05T02:33:41+5:302018-07-05T02:33:52+5:30
जलयुक्त शिवार अभियानातून सात गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जाणार होती. कर्जत तालुक्यात त्या सर्व ठिकाणी लोकसहभागातून कामेच झाली नाहीत.
कर्जत : जलयुक्त शिवार अभियानातून सात गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जाणार होती. कर्जत तालुक्यात त्या सर्व ठिकाणी लोकसहभागातून कामेच झाली नाहीत. त्याला कामे पूर्ण करण्याची जबाबदारी घेणारी एनजीओ आणि कृषी विभाग यांचा उदासीनपणा कारणीभूत ठरला आहे. अद्याप मजुरांना कोणताही मोबदला मिळाला नाही, त्यामुळे मजुरांची फसवणूक होत आहे.
तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१८साठी तब्बल दहा गावे निवडण्यात आली होती. त्यातील तीन गावांत कृषी विभाग थेट निविदा स्तरावर निधी खर्च करणार होता. त्या तीन कोटींच्या निधीमधून कळंब, कुरुंग आणि बेडीसगाव येथे ८० कामे झाली आहेत. १० गावांतील जलसंधारणाची कामे करण्यासाठी सहा कोटींचा निधी शासनाने मंजूर केला असताना त्यातील तीन कोटींमधून सात गावांत लोकसहभाग घेऊन कामे पूर्ण केली जाणार होती. त्यासाठी सलग समतर चर, अनगड दगड, जुन्या सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाळ काढणे, अशी १४० कामे प्रस्तावित होती. ती कामे लोकसहभागातून करण्यासाठी कर्जत तालुक्यातील प्रकृती स्वयंसेवी संस्था पुढे आली होती. त्यांनी रायगड जिल्हाधिकाºयांना सात गावांत जलसंधारणाची कामे करण्याचे मान्य केले होते. त्यांची मागणी असल्याने तेथे प्रकृती संस्थेला सहयोग म्हणून अधिकार देण्यात आले होते. या संस्थेला नांदगाव, बलिवरे,चई, चाफेवाडी, खांडस, चेवणे, झुगरेवाडी आदी गावांत कामे करण्याचे अधिकार मार्च २०१८मध्ये देण्यात आले होते.
मात्र, प्रकृती स्वयंसेवी संस्थेने केवळ दोन गावात तीन हेक्टर जमिनीवर लोकसहभागातून सलग समतर चर खोदण्याचे काम केले आहे. त्यासाठी ४५ कामगारांनी मजूर म्हणून काम केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, दोन महिने आठवड्यातून दोन दिवस काम करणाºया मजुरांना मोबदलाच मिळाला नाही. मग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सात गावांत कामे असतील तर ती कोणती याचे उत्तर कर्जत कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे सात गावांसाठी आलेला तीन कोटींचा निधी संबंधित स्वयंसेवी संस्था कृषी विभागाच्या सहकार्याने लाटत आहे का? याची चर्चा चई गावातील शेतकरी करीत आहेत.
मजुरांबद्दल प्रकृती संस्थेचे प्रमुख डॉ. शिवाजी दाम हेदेखील अवाक्षर काढत नाहीत, त्यामुळे संशय बळावला असून कृषी विभाग मजुरांना वाºयावर सोडून देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रकृती संस्थेकडून कामे सुरू आहेत. सलग समतर चर आणि अनगड दगड यांची कामे झाली आहेत. मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला का मिळाला नाही, याची माहिती घ्यावी लागेल.
- वैभव विश्वे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, कर्जत
आदिवासी लोकांना कामे करण्यासाठी बोलावून घेतले. त्या मजुरांना जॉबकार्ड तयार करण्यास सांगितले; पण केले नाहीत. त्यामुळे मोबदला देखील देण्यात आला नाही. तीन गावांत केवळ एक-एक काम करण्यात आल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊनही होऊ शकणारी कामे झाली नाहीत, त्यामुळे जमिनीत पाणी मुरविण्यासाठी केली जाणारी कामे झाली नाहीत. परिणामी, आमच्या भागातील पाण्याची समस्या कायम राहिली.
- कृष्णा शिंगोळे, ग्रामस्थ, चई