स्टेजवर आपल्याला काही जागा महिलांसाठी ठेवाव्या लागतील; देवेंद्र फडणवीसांची पेणच्या सभेत गुगली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:26 AM2024-04-27T06:26:16+5:302024-04-27T06:26:50+5:30
मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तटकरे यांना मतदान करत आहात, असे समजून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले
पेण : महिलांना बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करून स्वत:च्या पायांवर उभे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आता विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे त्यांनी जाहीर केले असल्याने २०२६ मध्ये दोन्ही सभागृहांत महिलांचा टक्का वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात मंचावर आपली जागा कमी करुन महिला आमदार, खासदारांना जागा द्यावी लागेल अशी गुगली टाकत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांची झोप उडवली.
महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पेण येथे शुक्रवारी सभा झाली. अनंत गीते यांना भाजप मतदान करत होता, त्या वेळी त्यांना गुदगुल्या होत होत्या. मात्र, आता ते आमच्यावर टीका करीत आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी गीतेंवर हल्लाबोल करतानाच उद्धवसेनेने जाहीरनामा घोषित करण्याआधी जमिनीवर पडला असल्याची टीका त्यांनी केली.
तटकरे हे हुशार असून, कुठे जुगाड करायचे हे त्यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तटकरे यांना मतदान करत आहात, असे समजून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. एकेकाळी पेणमध्ये विरोधात लढणारे रवींद्र पाटील आणि धैर्यशील पाटील हे दाेन नेते आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्यातील अढी दूर झाली आहे. ही फेविकॉलची न तुटणारी जोडी असल्याने त्याचा तटकरे यांना लाभ होणार आहे. माजी आमदार धैर्यशील पाटील आणि आ. रविशेठ पाटील हे दोन्ही नेते आगामी काळात राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या जागी दिसतील. त्यामुळे मनातील किंतु-परंतु काढून टाका, असेही ते म्हणाले. मंचावर सुनील तटकरे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजिनक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रवीण दरेकर, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. महेंद्र थोरवे आदी उपस्थित होते.