कर्जत : पावसाची खºया अर्थाने बॅटिंग सुरू झालेली नाही आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश होऊन बसला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस पडला नसल्याने, त्यावेळी भाताची रोपे सुकून गेली होती आणि आता हातात असलेल्या रोपांची लावणी शेतकऱ्यांनी केली आहे, पण पाऊस नाही. श्रावण महिन्यापर्यंत लावणी लांबणे ही अनेक वर्षांनंतर आलेली वेळ आहे. यामुळे या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळी स्थिती बनली असून, तालुक्यात पावसाचा दीड महिना संपायला आला आणि मुख्य महिना कोरडा जात असल्याने, पावसाची सरासरी केवळ ३० टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात आला आहे.
२१ जुलैपर्यंत कर्जत तालुक्यात अवघा ९९३ मिली इतका पाऊस झाला आहे. त्या पावसाची वार्षिक सरासरी ३० टक्के इतकी असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा भरपूर पाऊस आणि त्यात महापूर अशी स्थिती या महिन्यात असते. मात्र, यंदा कर्जत तालुक्यात अद्याप महापूर आला नाही की, नद्या दुथडी वाहून गेल्या नाहीत. दुसरीकडे गतवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि या वर्षीप्रमाणे गतवर्षीही जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता कडक ऊन पडलेले दिसत असून, जुलै महिन्यात दोन आठवडे पाऊस सुरू होता. मात्र, त्यातून नद्या दुथडी भरून वाहिल्या नाहीत. त्यानंतर, पावसाने घेतलेली विश्रांती चिंता वाढविणारी आहे.
यंदा पावसाने फारच निराशा केली आहे. लावणी पूर्ण करण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागली. आधीच भातशेतीचा व्यवसाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय. त्यातच कोरोनाचे संकट. पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकºयांची स्थिती फारच बिकट होईल. - रवींद्र मांडे, शेतकरी, दहीगाव, कर्जत