आगरदांडा : गणेशोत्सवाला अवघा दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणाºया शाडूच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबरच रंग साहित्य, प्लॅस्टर आॅफ पॅरिस व अन्य साहित्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. मजुरीचे दर वाढले असले तरी कुशल कारागीर मिळणे कठीण झाले आहे. सतत पडणारा पाऊस त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला आहे. केवळ कलेची असलेली आवड जोपासण्यापुरताच हा व्यवसाय उरला असल्याची खंत मूर्ती कारखानदार अच्युत चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुरुड तालुक्यातील गावोगावी ६० ते ७० गणेशमूर्ती शाळा असून, माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना कुटुंबीयांसह सर्व कामे करावी लागतात. गेल्या काही वर्षांत चांगले कारागीर मिळणे दुरापास्त झाले आहे. भक्तांकडून शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. मात्र, इंधन दरवाढ, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती वाढल्या.