अलिबाग : कोणत्याही माध्यमातून पेड न्यूजद्वारे उमेदवारांनी प्रचार करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन असून, यावर स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी अध्यक्ष असलेल्या माध्यम प्रमाणीकरण समितीचे (मीडिया सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) अत्यंत बारीक लक्ष आहे. विविध कारणास्तव मर्यादा उल्लंघन केल्याप्रकरणी माध्यम प्रमाणीकरण समितीने सर्वपक्षीय उमेदवारांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती रायगड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
‘पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्रात दौरा’ या आशयाची बातमी व दौऱ्याचा कार्यक्रम हा पेड न्यूज या सदरात मोडतो, अशी समितीची धारणा झाली आहे. या बातमीचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट का करण्यात येऊ नये, असा खुलासा मावळ मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना विचारावा व कार्यवाहीचा अहवाल मीडिया सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश पनवेल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना समितीने दिले आहेत.पनवेल येथून प्रसिद्ध होणाºया तीन वृत्तपत्रांत २५ मार्च २०१९ रोजी ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरु वात’ ही एकसारखी बातमी प्रसिद्ध झाली असून समितीला ही बातमी देखील पेड न्यूजचा प्रकार वाटतो. यास्तव याबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना खुलासा विचारून त्याचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.शिवसेना रायगड यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून त्यात अनंत गीते यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा अशी जाहिरात पक्षाच्या लोगोसह व इतर नेत्यांच्या छायाचित्रांसह टाकली आहे, त्याचबरोबर शिवसेना रायगडने निष्कलंक खासदार म्हणून अनंत गीते यांची फेसबुकवर जाहिरात पोस्ट केली आहे, यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे. प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुनील तटकरे यांची पक्षाच्या लोगोसह ‘कार्यकुशल नेतृत्व हेच रायगडचे भविष्य’ अशी जाहिरात फेसबुकवर पोस्ट केली आहे. खेड तालुका काँग्रेस आय पक्षाची फेसबुक पोस्ट असून त्यात खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष गौसभाई खतीब यांनी मुस्लीम समाज बंधू-भगिनींनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे, या प्रकरणी नोटीस बजावली आहे.पेड न्यूजबरोबरच आदर्श आचारसंहितेचा भंग, विशिष्ट समाजाला उद्देशून आवाहन, जातीय प्रचार आदी कारणास्तव दापोली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधितांना कार्यवाहीचे पत्र पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रमाणपत्र घेणे आवश्यकच्राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी किंवा उमेदवारांच्या पक्ष प्रतिनिधीनी जाहिराती टाकण्यापूर्वी मीडिया सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी, रायगड यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे,असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. या समितीचे कार्यालय रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आहे.