आंबिवलीतील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:12 PM2020-02-08T23:12:00+5:302020-02-08T23:12:12+5:30
औषधांसाठी आकारतात पैसे । आरोग्य विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत त्यांना प्राथमिक उपचार विनामूल्य मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्यकेंद्र स्थापन करण्यात आली आहेत. आरोग्यकेंद्रात नाममात्र नोंदणी शुल्क पाच किंवा दहा रुपये घेऊन रुग्णावर उपचार करून औषधे दिली जातात. मात्र, शासनाच्या योजनेला छेद देत आंबिवलीतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णांकडून सलाईन आणि इंजेक्शनसाठी पैसे घेऊन लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विचारणा केली असता, आरोग्य विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या खांडस, नेरळ, मोहिली, कळंब, आंबिवली असे पाच प्राथमिक आरोग्यकेंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी रुग्णांकडून केसपेपरसाठी म्हणून नाममात्र पाच किंवा दहा रुपये शुल्क आकारले जातात.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनाने तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय व एक उपजिल्हा रुग्णालयही आहे. त्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. कर्जत तालुका हा आदिवासीबहुल भाग असून, दुर्गम भागातील नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळण्यासाठी उत्तम पर्याय असले तरी जिल्हा परिषदेच्या धोरणाला कर्जत तालुक्यातील आंबिवली या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात छेद देण्यात येत आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात पाच रुपये केसपेपरव्यतिरिक्त रुग्णांकडून सलाईन आणि इंजेक्शन यासाठी वेगळे पैसे उकळले जात आहेत. इंजेक्शन हवे असेल तर २० रुपये व सलाईन लावायची असेल तर ६० रुपये असे दर असल्याचे रुग्ण सांगतात. खासगी उपचार परवडत नसल्याने या ठिकाणी येतो. दुसरा सरकारी दवाखाना कशेळे येथे आहे. तिथे जाण्यासाठी रिक्षा, बसचा अतिरिक्त खर्च होतो. त्यामुळे नाइलाजास्तव आंबिवलीच्या आरोग्य उपकेंद्रात पैसे देऊन उपचार घेत असल्याची व्यथा एका रुग्णाने मांडली.
आंबिवली हे कर्जत तालुक्यातील दुर्गम गाव असून, या आरोग्य उपकेंद्रांतर्गत अनेक छोटी-मोठी गावे, वाड्या, पाडे येतात. या ठिकाणी उत्पन्नाचे विशेष असे काही साधन नाही. शेती, मोलमजुरी, फार्महाउसवर माळीकाम, रखवालदार अशी कामे करून येथील लोक
उपजीविका चालवतात. शासनाच्या या आरोग्यसेवेचा त्यांना लाभ होण्याऐवजी त्यातून त्यांची लूट होत असल्याचे चित्र आहे.
आरोग्य उपकेंद्रातील औषधेही गायब आहेत. आरोग्य उपकेंद्रात औषधांचा साठाफलक अनेक महिने अद्ययावत केलेला नाही. केंद्रात औषधे आहेत, असे वाटत असताना साधी सर्दी-खोकला यांची औषधेदेखील उपलब्ध नाहीत.
याबाबत आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
त्यामुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य सभापती व उपाध्यक्ष असलेले सुधाकर घारे यांच्या तालुक्यातच ही लूट सुरू असल्याने अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
अनेकदा आरोग्य उपकेंद्रात औषधे नसतात, त्या वेळी औषधे का देत नाहीत म्हणून रुग्ण विचारतात. आताही दवाखान्यात खोकल्याचे कफ सिरप नाही. रुग्णांना बाहेरून गोळ्या, औषधे आणायला सांगितली की, बाहेरून का आणायचे? असे प्रश्न रुग्ण विचारतात. आम्ही कमी पैशात बाहेरून आणून दिली, तरी विचारणा होते.
- स्वप्निल बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी, आंबिवली, आरोग्य उपकेंद्र
आमची रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली, त्यात सलाईन आणि इंजेक्शनचे पैसे घेतले असल्याच्या तक्रारींवरती चर्चा झाली. त्यामुळे आता झाले; पण पुढे असे होणार नाही, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू
- सी. के. मोरे, तालुका
आरोग्य अधिकारी