वावोशी: खोपोलीत भरदिवसा वरच्या खोपोलीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वृध्देस लुटल्याची घटना सोमवारी घडली. वरच्या खोपोली येथील नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्या निवासस्थानासमोर ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. वरच्या खोपोलीत विठ्ठल रु क्मिणीचे मंदिर असून, सोमवारी सकाळी वृध्द महिला दर्शनासाठी मंदिरात आली होती. त्याच वेळी एक ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीही तेथे आला व त्याने वृध्द महिलेस आजचा दिवस चांगला आहे असे सांगून मी माझ्याकडचे दीड हजार रु पये देवासमोर ठेवतो तुम्ही तुमचे दागिने देवासमोर ठेवा असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या महिलेनेही सर्व दागिने देवासमोर ठेवले. त्यानंतर त्याने स्वत:चे पैसे, दागिने एका पिशवीत बांधले व महिलेस बोलण्यात गुंतवून दुसरी प्लॅस्टिक पिशवी देवासमोर ठेवली. तुमचे दागिने घ्या असे म्हणून तो क्षणार्धात गायब झाला. वृध्द महिला पिशवी उघडून पाहते तर, त्यात खाण्याची बिस्किटे होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दीड तोळे सोन्याची माळ व अर्धा तोळ्याची अंगठी असे दोन तोळे सोने घेवून भामटा पसार झाला. अशा प्रकारच्या लुटीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहे. (वार्ताहर)
खोपोलीत भर दिवसा वृध्देस लुटले
By admin | Published: August 11, 2015 12:28 AM