- सूर्यकांत वाघमारे।नवी मुंबई : सोने खरेदी करणा-या ग्राहकांची सोनारांकडून घोर फसवणूक केली जात आहे. २२ कॅरेटच्या नावाखाली १८ कॅरेटचे सोने हाती ठेवले जात आहे. बिलाद्वारे रक्कम मात्र २२ कॅरेटच्या दराप्रमाणे आकारली जात असून, त्याचेही ग्राहकाला बनावट (कच्चे) बिल दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.अंगावर जास्तीत जास्त सोने परिधान करून श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. त्यामध्ये महिलांपेक्षाही पुरुषांची आघाडी दिसू लागली आहे. मात्र, नागरिकांच्या सोन्याप्रति वाढत्या याच आकर्षणाचा गैरफायदा बहुतांश सोनारांकडून घेतला जात आहे.सोनाराने बाजारभावापेक्षा थोड्या-फार कमी दराने सोने देण्याचे आमिष दाखवले की, ग्राहक सहज तो दागिना खरेदी करतो. मात्र, अशा प्रकारचे आमिष फसवे असून त्याद्वारे ग्राहकांचीच आर्थिक लूट होत असते. ग्राहकाला दाखवले जाणारे दागिने १८ कॅरेटचे असूनही सांगताना मात्र ते २२ कॅरेटचे असल्याचे सांगितले जाते. या वेळी सोनाराकडून दागिन्याच्या शुद्धतेची हमीही दिली जाते. अशा वेळी सोनार परिचयाचाच असल्यामुळे अनेक जण दागिन्याच्या कॅरेटची खात्री न करताच, तो खरेदी करतात. मात्र, सोन्याच्या दागिन्यात भेसळ असते, हे निदर्शनास आणून देणारा प्रकार दिघा येथे घडला आहे.ईश्वरनगर येथे राहणाºया अभिषेक शाह यांनी परिसरातील विकास ज्वेलर्समधून दागिने खरेदी केले होते. सोनाराने त्यांच्याकडून रोख रक्कम घेऊन कच्चे बिल दिले होते. काही दिवसांतच सोने पिवळे दिसू लागल्याने दुकानदाराकडे सोन्याची शुद्धता तपासली असता, ते १८ कॅरेट असल्याचे समोर आले. त्यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे.हे प्रकरण दडपण्यासाठी परिसरातील सोनारांनी त्यांच्यावर दडपणही आणण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, तक्रारीच्या निर्णयावर ते ठाम राहिल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, शाह यांच्या बाबतीत घडलेला प्रकार जरी उघडकीस आला असला, तरी शहरातील इतरही सोनारांकडून ग्राहकांची लूट सुरूच आहे. ही लूट थांबवण्यासाठी प्रशासनाकडून शहरातील सोनारांचे बिलबुक तपासण्याची मागणी दक्ष नागरिकांकडून होत आहे.
सोनारांकडून ग्राहकांची लूट, कॅरेटमध्ये फसवणूक, बनावट बिलाद्वारे व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 4:40 AM