पारंपरिक आंग्रेंच्या घेरीयात लुटले सोने
By admin | Published: October 23, 2015 12:18 AM2015-10-23T00:18:57+5:302015-10-23T00:18:57+5:30
सरखेल कान्होजी राजे यांच्या काळात आपल्या सर्व समाज बांधवांना सोबत घेवून विजया दशमीच्या संध्याकाळी आंग्रेकालीन राजराजेश्वरी देवीचे दर्शन घेवून आंग्रेवाड्यात
अलिबाग : सरखेल कान्होजी राजे यांच्या काळात आपल्या सर्व समाज बांधवांना सोबत घेवून विजया दशमीच्या संध्याकाळी आंग्रेकालीन राजराजेश्वरी देवीचे दर्शन घेवून आंग्रेवाड्यात सोने लुटण्याचा आणि एकमेकास आलिंगनासह सोने देण्याची प्राचीन अशी परंपरा आहे. सरखेल कान्होजी राजे यांचे विद्यमान वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ही परंपरा आजही अबाधित राखली आहे.
आता रघुजीराजे आंग्रे यांचे निवासस्थान हिराकोट किल्ल्याशेजारी असून ते ‘घेरीया’ या नावाने ओळखले जाते. दरवर्षी या घेरीयामध्ये संध्याकाळी पाच वाजता मराठा बांधव सहकुटुंब एकत्र येतात. घेरीयातील भगव्या ध्वजस्तंभाखाली ठेवलेल्या आपट्याच्या पानांच्या सोन्याचे रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते पूजन झाल्यावर पुरुषांचा सामूहिक सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला तर त्यानंतर महिलांनी सामूहिक सोने लुटले.
आपल्या पूर्वजांचा पराक्रम आणि त्यांनी घालून दिलेल्या परंपरांचा परिचय आपल्या पुढच्या पिढ्यांना होण्याचे हेतूने हे सीमोल्लंघन महत्वाचे आहे. आजची पिढी आपापल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशोशिखरे पादाक्रांत करत असतानाच आपल्या इतिहासाबरोबरची आपली नाळ तुटणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे या निमित्ताने ‘लोकमत’शी बोलताना रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.