ग्रामीण भागात किराणा दुकानदारांकडून लूट, चढ्या दरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:45 AM2020-04-28T01:45:13+5:302020-04-28T01:45:26+5:30
रोजचा स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, कडधान्ये, डाळी, मसाले, तेल, भाजीपाला, चढ्या दरात विक्री करत आहेत. अवाच्या सव्वा रक्कम घेत असल्याने ग्राहक संतापले आहेत.
नेरळ : कर्जत तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागात ही किरकोळ किराणा दुकानदार, व्यापारी मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ करून ग्राहकांना लुटत आहेत. रोजचा स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, कडधान्ये, डाळी, मसाले, तेल, भाजीपाला, चढ्या दरात विक्री करत आहेत. अवाच्या सव्वा रक्कम घेत असल्याने ग्राहक संतापले आहेत.
वर्षानुवर्षे याच सर्वसामान्य ग्राहकराजाच्या जीवावर आपला व्यवसाय करून संपत्ती कमावलेल्या दुकानदार, व्यापारी या संकटसमयी ग्राहकांची लूट करताना दिसत आहेत, सरकारच्या सूचनांना धाब्यावर बसवून चढ्या दराने मालाची विक्री करत आहेत. ‘परवडत असेल तर घ्या... नाही तर घरी जा...’ असे शब्दही ग्राहकांना ऐकावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येते. नाइलाजाने पोटाची भूक भागवण्याकरता चार वस्तूंसाठी आणलेल्या पैशात एक- दोन वस्तू घेऊन घरी परतावे लागत आहे .
कर्जत तालुक्यात अनेक सेवाभावी संस्थांनी, दानशूरांनी आपापल्या परीने तालुक्यातील आदिवासी भागात मदत पोहोचवली आहे. मात्र इतर समाजातील सर्वसामान्य लोकांना गरज असूनही केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी हे लोक मदत स्वीकारायला पुढे येत नाहीत म्हणा किंवा मदत करणाºयाचा कल आदिवासी समाज बांधवांकडे जास्त दिसून येतो. त्यामुळे इतर मध्यमवर्गीय लोकांना मदतीची गरज असल्याचे जाणवते.
>सामान्यांची कोंडी
तालुक्यातील ग्रामीण भागात दुकानदारांकडून किराणा सामानाचे भाव अवाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत, परिणामी सर्वसामन्यांची या लॉकडाउनच्या काळात कोंडी होत आहे. या संकटाच्या वेळी ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.