- गिरीश गोरेगावकर माणगाव : मागील आठवडाभरात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोरेगाव शहर आणि परिसरातील शेतीला सलग आठ दिवस पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळे भातशेतीसह शेतकरी संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीवर पाणी तुंबलेले राहिल्याने भाताचे पीक कुजून तसेच करपून गेले आहे, त्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाने या भागाची तातडीने पाहणी करून ओला दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.दक्षिण रायगड या भागाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य जनता ही पावसाळ्यात शेतीवरती अवलंबून असते. मागील आठवड्यात गोरेगाव विभागात विक्रमी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर भात लागवडीची शेती सलग आठ दिवस पुराच्या पाण्याखाली होती. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणी वेळेवरती आटोपली होती तर भातपिकांची रोपेही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला होता. गोरेगावातील संत रोहिदास नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, हौदाची आळी, टेकडीची आळी, गवळआळी, गोरोबानगर येथील नागरिक आजही शेतीवरतीच आपली उपजीविका करत आहेत. काळनदीला पूर आल्याने आठवडाभर पुराचे पाणी शेतामध्येच राहिले होते. महापुराचा तडाखा बसल्यानंतरही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतीच्या रूपाने मोठी वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गोरेगावचे सरपंच जुबेरअब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलेकर, विनोद बागडे, सचिन बागडे, सुरज पवार या ग्रामपंचायत सदस्यांसह विजयराज खुळे, मुख्तार वेळासकर, विकास गायकवाड यांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीची पाहणी केली असता शेतकऱ्यांनीआपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यानंतर महसूल तसेच कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.सध्या पूरपरिस्थितीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावर चिखल आणि माती आल्याने अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून लेप्टो स्पायरोसिससारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर व्हायरल फिवर, मलेरिया, डेंग्यू हे आजारही उद्भवू शकतात. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी घर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळभाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे.- डॉ. दिगंबर गीतेरसायनमिश्रीत पाणी शेतातमहाड भागातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या पुरामुळे रासायनिक पाण्याचा मोठा फटका शेतीला बसला. शेतामध्ये रसायनमिश्रित पाणी शेतात थांबून राहिल्याने रोपे मोठ्या प्रमाणात करपलेली पाहायला मिळत आहेत. पावसाने यंदाचे पीक घालविल्यामुळे वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोरेगावातील शेतीचे नुकसान; पीक कुजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:04 PM