नामदेव मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना व निसर्ग चक्रीवादळातून सावरलेल्या शेतकऱ्यांच्या मनात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अतिवृष्टीमुळे धडकी भरली आहे. पनवेल परिसरात काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे.
भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्याची विशेषत: पनवेल, उरणची काही वर्षांपूर्वी राज्यभर ओळख होती. परंतु नवी मुंबईची उभारणी, एमआयडीसी, जेएनपीटी व इतर प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले. नैनामुळे उरलेल्या शेतीच्या जागेवरही इमारती उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंटच्या जंगलातही अद्याप हजारो शेतकºयांनी शेती व्यवसाय सुरूच ठेवला आहे. भात हेच या परिसरातील प्रमुख पीक आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली आहे. परंतु काही महिन्यांपासून शेतकºयांच्या जीवनात संकटाची मालिकाच सुरू आहे. कोरोनामुळे मार्चपासून जनजीवन विस्कळीत झाले. त्यातून सावरत असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान केले. वादळाशी सामना करून भाताची लागवड करून त्याची देखभाल करण्यात शेतकरी व्यस्त असतानाच बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.पळस्पे व इतर ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेरे व इतर ठिकाणी शेतीचे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भातशेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पाऊस पडला तर तो शेतकºयांना हवाच आहे. परंतु मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवशी पनवेलमध्ये ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. पळस्पे, कर्नाळा, तारा व इतर अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. शेतात केलेले श्रम पाण्यात वाहून गेले आहेत.शासनाकडून मदतीची मागणीपनवेल परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे जमिनीवर पडली आहेत. शेतकºयांनी केलेले परिश्रम पाण्यात गेले आहेत.-चंद्रकांत भगत,प्रगतशील शेतकरी, पळस्पे
अतिवृष्टीमुळे कर्नाळा परिसरातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तारा गाव व परिसरातील भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली असून, नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना शासनाकडून मदत उपलब्ध व्हावी.- मोरेश्वर पाटील,शेतकरी तारा गाव
नेरे परिसरात बुधवारी अतिवृष्टी झाल्याने फारसे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अशा प्रकारे पाऊस पडला तर पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.- परेश पाटील, शेतकरी, नेरे गाव