पेणमध्ये गणेशमूर्तिकारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:58 AM2019-07-29T01:58:11+5:302019-07-29T01:58:37+5:30
पंचनामे सुरू : तांबडशेत, जोहे, कळवे येथील कारखान्यांत शिरले पाणी
दत्ता म्हात्रे
पेण : तालुक्यातील ग्रामीण भागातील गणेशमूर्ती कार्यशाळांनी विस्तारलेली कलानिर्मितीचे मुख्य केंद्र असलेल्या जोहे, तांबडशेत, कळले कलानगरीला गेल्या पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जोहे तलाठी बी.के.पाटील यांनी रविवारी सकाळी ११.०० वाजता तांबडशेत गावापासून नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून तांबडशेत येथील १८ ते २० कारखान्यात गणेशमूर्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय या गावातील २५ते ३० घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, कपडे इतर सामानाचे नुकसान झाले आहे.
शनिवारी दिवसभर पुरामुळे या गावातील रस्ता पाण्याखाली गेला आणि रस्त्यालगतचे मुर्तीकलेच्या कारखान्यात पाच फूट पाणी साचल्याने गणेशमूर्ती भीजून मोठ्या प्रमाणात नुकसानीला गणेश मूर्तीकारांना सामोरे जावे लागणार आहे. महिन्याभरात गणपती उत्सव सुरू होणार असल्याने घेतलेल्या आॅर्डर कशा पूर्ण करणार या संकटात मूर्तीकार सापडले आहेत. तांबडशेत, जोहे, कळवे, या गावात कच्चा गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. जोहे तलाठी सजामध्ये या गावांचा समावेश होतो. रविवारी तांबडशेत गावातील पंचनामे सुरू केले असून उर्वरित जोसेफ, कळवे गावात पंचनामे सुरू करण्यासाठी तलाठी व कर्मचारी धावपळ सुरू होती. पाताळगंगा व बाळगंगा नद्यांच्या प्रवाहाचे पाणी घुसून या कलानगरीची मोठी हानी झाली आहे. या ठिकाणी ४५०ते ५५० कारखाने असून मूर्तीच्या संख्या सुध्दा लाखोंच्या घरात आहे. प्रत्यक्ष आर्थिक नुकसानीचा आकडा पंचनामे केल्यानंतर समजेल मात्र एका कारखान्याचे ३०ते ३५ हजारांहून अधिक नुकसान झाल्याचे तलाठ्यांचे म्हणने आहे.