आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असतानाही जीवितहानी; पावसाळी मासेमारी बंद अनाठायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2024 09:03 PM2024-06-08T21:03:47+5:302024-06-08T21:04:13+5:30
माशांचा प्रजनन काळ यासाठी शासनाची पावसाळी मासेमारी बंदी अनाठायी असल्याची मच्छीमारांची टीका
मधुकर ठाकूर
उरण : जीवितहानी आणि माशांचा प्रजनन काळ या दोन बाबी विचारात घेऊन शासनाकडून दरवर्षी करण्यात येत असलेली पावसाळी मासेमारी बंदी अनाठायी असल्याची टीका करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली आहे.
राज्यातील मुंबई,ठाणे,रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी या पाच जिल्ह्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.हवामान आणि निसर्गाच्या लहरीवरच चालणार्या या व्यवसायावर सुमारे १२ लाखाहुन अधिक कुटुंब उदरनिर्वाह चालवितात.विविध प्रकारातील मासेमारी व्यवसायातुन मोठ्या प्रमाणात मासळीची निर्यात केली जाते.मासळी निर्यातीच्या व्यवसायातुन देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.मात्र देशाला प्रचंड परकीय चलन मिळवुन देणार्या मासेमारी व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सातत्याने होणारी इंधन दरातील वाढ,मासळीला न मिळणारा हमीभाव, संघटीत दलांलाकडुन होणारी प्रचंड लुबाडणुक,शासनाकडून डिझेल परतावे मिळण्यास होणारा विलंब या तर मच्छीमारांना नित्याच्याच भेडसाविणार्या समस्या आहेत.
शिवाय मच्छीमारांना शासनाकडुन यांत्रिक बोटी बांधणे,यांत्रिक स्पेअर्स पार्ट,नेट आणि इतर सामुग्रीवर मिळणार्या विविध सवलतीही मिळणे बंद झाल्या आहेत.दररोज वाढत जाणारे साधन सामुग्रीचे भाव तर मच्छीमारांच्या तोंडचे पाणीच पळवतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी कामगार वर्गही मोठ्या प्रयासाने उपलब्ध झालेच तर समुद्रात जाणविणार्या मासळी दुष्काळाचा सामना करण्याची नामुश्किलीची पाळी मच्छीमार व्यावसायिकांवर येते.त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीसाठी एका ट्रिपवर होणारा सुमारे साडेतीन लाखांचा खर्चही वसुल होत नाही.त्यातच खराब वादळी हवामान आणि उद्भभवणार्या नैसर्गिक आपत्तीमध्ये काही दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागतो.
इतक्या समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या मच्छीमारांवर गलितगात्र होण्याची येते.त्यातुन उभारण्याची संधी मिळे तोपर्यत शासनाच्या पावसाळी मासेमारी बंदीचे आदेशही लागु होतात.यावर्षीही एक जुन पासुन ३१ जुलै पर्यत असे ६१ दिवसांसाठी शासनाने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र मुळातच मागील काही वर्षांपासूनच खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या राज्यातील मच्छीमारांनी आधुनिकीकरणाची कास धरली आहे.लाटांशी मुकाबला करण्यासाठी आधुनिक मच्छीमार नौकांचा वापर मच्छीमारांकडून आता केला जात आहे. निवडक आणि अचूक मासेमारी करण्यासाठी फिश फाइंडर यंत्रणाही बोटीत बसविली जाते आहे.
तसेच हवामानाचा अंदाज घेणारी अद्यावत जीपीएस यंत्रणाही बोटीत बसविलेली असते.यामुळे पाऊस, वादळीवाऱ्याची सुचना अगोदरच मिळत असल्याने मच्छीमार बोटी सहजपणे सुरक्षितपणे बंदरात येऊन पोहोचतात.खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. या विकसितपणामुळे मागील काही वर्षांपासून जीवितहानी होण्याच्या घटना नगण्य आहेत.तसेच पावसाळी मासेमारी बंदीसाठी माशांच्या प्रजनन काळाचे कारण शासनाकडून पुढे केले जात आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरच पावसाळी हंगामातच मासळीचा प्रजननासाठी येत असते याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.कारण प्रत्येक जातींच्या माशांचा प्रजननाचा काळावधी हा वेगवेगळा आहे.
शिवाय खोल समुद्रातील मासेमारी १२ सागरी नॉटीकल मैला पलिकडे जाऊन केली जाते.त्यामुळे अद्यावत बोटी मासेमारीसाठी किनाऱ्यावर जात नाहीत.त्यामुळे जीवितहानी आणि माशांचा प्रजनन काळ या दोन बाबी पावसाळी मासेमारी बंदीसाठी अनाठायी असल्याची टीका करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली आहे. आधुनिक क्षमतेच्या बोटींची वाणवा असलेले आणि समुद्र किनारपट्टी परिसरात मासेमारी करणाऱ्या पालघर, ठाणे परिसरातील काही मच्छीमारच पावसाळी मासेमारी बंदीसाठी आग्रही असतात.मात्र शासनाची पावसाळी मासेमारी बंदी पुर्णतः चुकीची आहे.याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.यासाठी शास्त्रज्ञांशी खुलेपणाने चर्चा करण्यासाठीही मच्छीमारांची तयारी असल्याचे करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी माहिती देताना शासनालाच एक प्रकारे आव्हानच दिले आहे.