Cyclone Nisarga: ‘निसर्ग’पुढे सारे नमले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:00 AM2020-06-14T00:00:35+5:302020-06-14T00:03:18+5:30

श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

loss in raigad due to Cyclone Nisarga | Cyclone Nisarga: ‘निसर्ग’पुढे सारे नमले...

Cyclone Nisarga: ‘निसर्ग’पुढे सारे नमले...

Next

- संतोष सापते

महाराष्ट्राच्या इतर प्रांतांच्या तुलनेत कोकणाची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. एका ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अवघ्या सहा तासांत सर्वसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आणि भविष्य यांचा अक्षरश: चुराडा केला. ३ जून २०२० पूर्वीचा व सद्य:स्थितीतील रायगड जिल्हा यात प्रचंड तफावत पडली आहे. ताशी १२० चा वेगवान वारा व जोरदार पाऊस यामुळे नारळ, सुपारी, केळी व आंबा या पिकांना जमीनदोस्त केले.

श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यातच, ‘निसर्ग’ चक्रीवादळाने शेतीची अगणित व कधीही भरून न येणारी हानी केली आहे. आज सर्वसामान्य माणसासमोर जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनवृद्धीसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असलेल्या व्यक्तीला प्रतिवर्र्ष नारळ, सुपारी, केळी व फणस याद्वारे साधारणत: ६० हजारांच्या आसपास उत्पन्न मिळते. मात्र, आगामी आठ वर्षांसाठी या उत्पन्नास शेतकरी मुकेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आंब्यासारखे डेरेदार अनेक पिढीचे साक्ष देणारे वृक्ष अस्तित्वासाठी चक्रीवादळात झुंजताना दिसले. आता आंबा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी त्याला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने दिलेले १०० कोटींचे आर्थिक पॅकेज चक्रीवादळग्रस्त लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, त्या मदतीतून वादळग्रस्त लोकांच्या जीवनाला नवीन दिशा व स्फूर्ती देणे प्रथमदर्शनी तरी अशक्य वाटत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, मुरूड, अलिबाग या तालुक्यांतील जनतेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. रायगड प्रशासनाने केलेल्या योग्य आपत्तीपूर्व नियोजनामुळे सुदैवाने मोठ्या स्वरूपातील जीवितहानी टळली. त्याबद्दल, प्रशासनाचे कौतुक करणे योग्य ठरेल.

आपत्तीपूर्व श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, भरडखोल, दिघी व श्रीवर्धन शहरांतील जीवना कोळीवाडा या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र, मोबाइलसेवा, इंटरनेट यास पर्याय शोधण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली. वादळामुळे महावितरणच्या सर्व वीजखांबांची वाताहत झाली. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युतपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला.

श्रीवर्धनमध्ये चक्रीवादळामुळे घरावरची कौले, पत्रे, घराच्या भिंती आणि असंख्य वृक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रायगड प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुक्यातील जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला वादळाने पूर्णत: जेरीस आणले आहे. सर्वसामान्य लोकांनी शासनाची मदत येण्यापूर्वीच आपल्या घराच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. त्यात अनेक दुकानदारांनी वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने मालाची विक्री केली. मात्र, पावसाळा डोक्यावर आला असताना सर्वसामान्य जनतेने मिळेल त्या किमतीत घरबांधणीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आहे.

श्रीवर्धन शहरात जवळपास २१० सुपारी व नारळाच्या वाड्या होत्या. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार, मारळ, बागमांडला, नागळोली अशा अनेक गावांत नारळ, सुपारीचे पीक घेतले जात होते. आजमितीस हे सारे पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यात पावसाळा दारात उभा ठाकला असताना या संकटातून कोकणवासीय सावरलेले नाहीत, तेव्हा शेतीचा हंगाम किती यशस्वी होणार, लागवड किती होणार, हा मोठा प्रश्न आहे.

पारंपरिक पद्धतीने शेती करणाºया येथील शेतकऱ्यांना योग्य भाव व सवलतीत बियाणे व साहित्य आगामी कालावधीसाठी देणे गरजेचे आहे. कोकणातील शेती ही हेक्टरात नसून गुंठ्यांत आहे. एका सातबाºयावर चारचार व्यक्तींची नावे आहेत. सरकारने मदत करताना किंवा सवलत देताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.

कोळी समाजाची अवस्था बिकट
रायगड जिल्ह्यात कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. चक्रीवादळात अनेकांच्या बोटी फुटल्या, नष्ट झाल्या. सरकारने कोळी समाजाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीसाठी अभ्यासपूर्ण व निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे.

Web Title: loss in raigad due to Cyclone Nisarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.