समुद्राला उधाण आल्याने खारबंदिस्ती फुटून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:06 PM2020-03-12T23:06:27+5:302020-03-12T23:07:11+5:30
चार गावांना फटका : शेकडो एकर शेतजमीन नापिकी होण्याची भीती
उरण : समुद्राच्या उधाणात खोपटे गावाजवळ खारबंदिस्ती फुटून खारे पाणी शेतजमिनीत शिरल्यामुळे शेकडो एकर शेतजमीन नापिकी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर ही खारबंदिस्ती दुरुस्त केली नाही तर आणखी शेतजमीन नापिकी होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उरण तालुक्याला मोठा समुद्रकिनारा आहे. समुद्राचे पाणी शेतीमध्ये शिरू नये यासाठी मोठमोठे बांध बांधले आहेत. त्याची काळजी घेणे ही खारभूमी विकास मंडळाची आहे. मात्र अनेक ठिकाणी खारबंदिस्तीची कामे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे उरण पूर्व भागात अनेक ठिकाणी खाडीची बांधबंदिस्ती फुटून शेतजमिनीत पाणी शिरते. खोपटे परिसरात ज्या ठिकाणी खारबंदिस्ती फुटली आहे त्या ठिकाणची खारबंदिस्तीची कामे कित्येक वर्षे झाली नसल्यामुळे खाडीचा बांध कमकुवत झाला आहे. या ठिकाणी पूर्वी मिठागरे होती. त्या वेळी नियमितपणे खारबंदिस्तीची दुरुस्ती त्यांच्याकडून करण्यात येत होती. मात्र सध्या या ठिकाणची मिठागरे बंद झाल्यामुळे खारबंदिस्तीची दुरुस्ती केली जात नाही. ही खारबंदिस्ती दुरुस्त करण्याची जबाबदारी खारभूमी विकास विभागाची आहे. खारभूमी विकास योजनेमध्ये समुद्रकिनारी किंवा खाडीकिनारी उच्चतम भरतीच्या पातळीवर मातीचा बांध घालून भरतीचे पाणी उथळ जमिनीवर पसरणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होते.
मात्र गेल्या कित्येक वर्षांत उरणच्या खारबंदिस्तीची दुरुस्ती केली नसल्यामुळे कमकुवत झालेली खारबंदिस्ती फुटून खारे पाणी शेतजमिनीत शिरून शेतजमीन नापीक होते. एकदा खारे पाणी शेतीत गेल्यास कमीत कमी चार वर्षे त्या शेतीत भातपीक उगवत नाही. दोन वर्षांपूर्वी पुनाडे-केळवणेची खारबंदिस्ती फुटून हजारो एकर शेतजमीन नापिकी झाली आहे. या शेतीमध्ये अद्यापपर्यंत पीक उगवत नाही. खोपटे गावाची शेतीही नापिकी होण्याचा धोका आहे. त्यातच होळीला भरती येत असल्याने ही बंदिस्ती फुटण्याचा धोका असतो. सध्या हे पाणी शेता-शेतातून खोपटे गावापर्यंत पोहोचले आहे. लवकरात लवकर ही बंदिस्ती दुरुस्त केली नाही तर गोवठणे, कोप्रोली, आवरेतील नापीक होण्याची शक्यता आहे.