निवडणुकीसाठी उदंड उत्साह
By admin | Published: December 17, 2015 11:26 PM2015-12-17T23:26:38+5:302015-12-17T23:26:38+5:30
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथम निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी १७ प्रभागांतून तब्बल ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना
म्हसळा : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथम निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी १७ प्रभागांतून तब्बल ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली असून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी आघाडी न करता स्वबळावर लढण्याची तयारी दाखविली आहे.
म्हसळा नगरपंचायत निवडणुकीतील १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची
गुरु वारी शेवटची तारीख असल्याने सकाळपासूनच तहसीलदार कार्यालयासमोर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. म्हसळा नगर पंचायत ही पहिलीच निवडणूक भाजपा- शिवसेना युतीच्या माध्यमातून लढविली जात असून भाजपाला ३ तर शिवसेना ४ असा फॉर्म्युला निश्चित झाला. शिवसेना ४, राष्ट्रवादी १७, भाजपा ३, तर काँग्रेस १५, शेकापने २ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तब्बल ३१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीत बंडखोरी व अपक्षांच्या उमेदवारीने रंगत येणार आहे. शुक्र वारी छाननी असून २८ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. (वार्ताहर )
माणगाव ११६, तळासाठी ७९ उमेदवारी अर्ज
माणगाव नगरपंचायतीतील १७ जागांकरिता एकूण ११६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती माणगांवचे तहसीलदार महेश सागर यांनी दिली आहे तर तळा नगरपंचायतीच्या १७ जागांकरिता ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तळ््याचे तहसीलदार बी.बी.सावंत यांनी दिली आहे.
पोलादपूरमध्ये ६४ उमेदवारी अर्ज दाखल
पोलादपूर : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागात ४,४६८ मतदार संख्या आहे. शिवसेना या एकमेव पक्षाकडून १७ प्रभागात २१ उमेदवारी अर्ज भरले असून १७ पैकी १७ प्रभागांमध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर काँग्रेस पक्षाने एकूण १३ प्रभागात एकूण १७ उमेदवारी अर्ज भरले आहेत. आणि राष्ट्रवादीने १७ प्रभागापैकी ०७ उमेदवार अर्ज दाखल केले तर भारतीय जनता पक्ष ०७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ०४, शेतकरी कामगार पक्ष ०२, अपक्ष ०४, असे एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
खालापूरमध्ये ८६ उमेदवार रिंगणात
खालापूर : खालापूर ग्रा.पं.चे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले असून या नगरपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक होत असून गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास ६४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
बुधवारी शेकापने २२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एकूण ८६ जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व शेकाप यांनी १७ तर मनसेने ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहे.
काही अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले. ग्रामपंचायतीची नगरपंचायत होत असल्याने या प्रथम नगरपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवावा यासाठी सर्वच पक्ष व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. खालापूर नगरपंचायतीसाठी पहिली सार्वत्रिक निवडणूक १० जानेवारीला होत आहे. भाजपा व काँग्रेस या पक्षाच्या वतीने काही प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यावेळी शेकापचे तालुका चिटणीस संतोष जंगम यांनी शेकापच्या जवळपास सर्वच उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे दाखल केले. तर शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप यांनी सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
गुरुवारी दिवसभर तहसील कार्यालयात नेते व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. सेना व राष्ट्रवादीच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन केलेले पहावयास मिळाले. सर्वच पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वच पक्षांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.