जेएसडब्ल्यू कंपनीतून धुरांचे लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:55 PM2020-07-29T23:55:09+5:302020-07-29T23:56:23+5:30

वासाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : काही काळ काळोख झाल्याने धावपळ

Lots of smoke from JSW company | जेएसडब्ल्यू कंपनीतून धुरांचे लोट

जेएसडब्ल्यू कंपनीतून धुरांचे लोट

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या चिमणीमधून धूळमिश्रित धुरांचे लोळ बाहेर पडले. लाल रंगाच्या या धुराचा वास अतिशय असह्य करणारा होता. त्यामुळे पेणसह अलिबाग तालुक्याच्या काही परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीबाबत उलट-सुलट चर्चेचे रान उठले आहे. त्यातच कंपनीच्या चिमणीमधून अचानक लाल रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने परिसरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले. ही घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पेण आणि अलिबाग तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असल्याने रस्त्यावर, तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होती. त्याचप्रमाणे, कंपनी परिसराच्या बाजूला मोठ्या संख्येने नागरी वस्तीही आहे. कंपनीच्या चिमणीमधून अचानक धुळीचे लोळ पसरल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले. या धूळमिश्रित धुरामुळे डोळे चुरचुरत असल्याने कंपनीमधून विषारी वायू पसरला तर नाही ना, अशी शंका नागरिकांमध्ये होती. सुमारे २० मिनिटे चिमणीतून धुरांचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. त्यामुळे परिसरामध्ये कोळोख पसरला होता. आपल्या आजूबाजूला कोण आहे की नाही, हेही कळत नव्हते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते.
दाट पसरलेल्या धुरामुळे समोरचे दिसेनासे झाले होते. लालसर रंगाचा प्रचंड धूर आणि त्याच्या उग्र वासामुळे डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव, वाशीसह परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना असह्य झाले होते. मात्र, नेमके काय झाले? याबाबत काहीही माहिती नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण होते. दरम्यान, जेएसडब्ल्यू कंपनीतील
प्लान्ट शटडाऊन झाल्याने धुळीचे लोळ उठले होते. हा विषारी वायू नसल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी स्पष्ट करून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीमध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. सकाळी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या कोक ओव्हन प्लान्टमध्ये इलेक्ट्रिक पॉवर ट्रिप झाली. त्यामुळे कोक बनवण्याची प्रक्रिया बंद पडली आणि शटडाऊन होऊन मोठ्या प्रमाणात चिमणीमधून धुळीचे लोळ बाहेर पडले. वातावरणात पसरलेला हा धूर विषारी नाही. प्लान्ट पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
- नारायण बोलबुंडा,
जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू

Web Title: Lots of smoke from JSW company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.