लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल: मागील वर्षी लम्पी आजाराने थैमान घातला होता.पनवेल मध्ये यावर्षी देखील या आजाराने शिरकाव केल्याचे दिसुन येत आहे.पनवेल तालूक्यात वावंजे गावात एका फार्म वर लंम्पि सदृश्य आजाराने गाय दगावली असून दहा पेक्षा जास्त गुराना आजारांनी गाठले आहे.धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे साथ रोग वाढत असताना पशुवैद्यकीय अधिकारी याठिकाणी फिरकले नसल्याचा आरोप शेतकरी व फार्म चे मालक मयुर खानावकर यांनी केला आहे.
येथील गुरांच्या शरीरावर पूर्णपणे जखमा झालेल्या आहेत.अनेक जनावरांचा मास गळून पडत आहे.वावंजे येथील पशुधन पर्यवेक्षक पद मागील वर्षभरापासून रिक्त असल्याने गुरांवर उपचार खाजगी रुग्णालयात करावे लागत आहे.याकरिता खाजगी डॉक्टरांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत.लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सन २०२२-२३ मध्ये राज्यात 'लम्पी'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. गंभीर लक्षणे असलेल्या जनावरांचा मृत्यूही झाला होता.दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पनवेल मध्ये पुन्हा लम्पी आजाराचा शिरकाव झाल्याचे दिसून येते.पनवेल तालुक्यात शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग आहेत.ग्रामीण भागात आद्यपही मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.हि संख्या 14145 एवढी आहे.
पनवेल तालुक्यात तीन पदे रिक्त
पनवेल तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती तसेच विविध कामे गुरांच्या मदतीने केली जातात.विशेष म्हणजे बैलांची शर्यती देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असताना वावंजे,तळोजे,तारा या विभागात पशुधन पर्यवेक्षक हि पदे रिक्त आहेत.
ही आहेत लम्पीची लक्षणे?
ताप येणे, त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येणे तसेच तोंडात, घशात व श्वसननलिका, फुप्फुसांत पुरळ व फोड येणे, तोंडातून लाळ गळती, अशक्तपणा व भूक मंदावते.
संबधित आजार हा लंम्पि आहे कि नाही हे प्रत्यक्षात पाहिल्यावरच सांगता येईल.अद्याप पनवेल मध्ये या आजाराची अधिकृत लागण झाल्याचे समोर आले नाही.वावंजे येथील पशुधन पर्यवेक्षक पद रिक्त आहे.तरी मी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याबाबत तपासणी करणार आहे.तालुक्यात सर्व पशुधनांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. - डॉ आनंद मारकवार (पशु विकास विस्तार अधिकारी,पनवेल पंचायत समिती )