चंद्रशेखर टिळक यांचे आज अलिबागमध्ये व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:36 AM2018-02-24T00:36:28+5:302018-02-24T00:36:28+5:30
देशातील नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर देशाच्या अर्थकारणात अनेक बदल घडून आले.
अलिबाग : देशातील नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर देशाच्या अर्थकारणात अनेक बदल घडून आले. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवरील केंद्रीय अर्थसंकल्पास यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आणि आता राज्याचा अर्थसंकल्प याच सर्व पार्श्वभूमीवर मांडला जाणार आहे. याच सर्व घडामोडी आणि अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्या उद्बोधक आणि माहितीपूर्ण व्याख्यानाचे आयोजन शनिवार, २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले आहे.
सर्वांकरिता मुक्त प्रवेश असलेल्या या व्याख्यानाचे आयोजन ‘लोकमत’आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक प्रारंभी या विषयाची विस्तृत मांडणी करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले आहे.