उरण (मधुकर ठाकूर) : उरण शहरातील विकास कामांना अधिक प्राधान्य देण्यात येईल असे सांगतानाच सध्या प्रगतीपथावर असलेल्या साडे सहा कोटी खर्चाचे प्रशासन भवनाचे काम येत्या तीनचार महिन्यात पुर्ण होईल असा विश्वास उनपचए नवनियुक्त मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली.
उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी १५ दिवसांपूर्वीच पालिकेचा पदभार स्वीकारला आहे. नवीमुंबई,ठाणे, रायगडमध्ये प्रशासकीय सेवा बजावलेल्या जाधव यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव आहे.या अनुभवाच्या जोरावर प्रथम प्राधान्य उरण शहरातील रखडलेल्या विकास कामांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी काही निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उनपमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे.त्यामुळे अनेक विकास कामांना गती मिळालेली नाही.उरण नगरपरिषदेचे प्रशासकीय भवनही मागील काही वर्षापासून रखडत रखडत सुरू आहे. वैशिष्ट्ये पुर्ण योजनेतून साडेसहा कोटी खर्चाच्या आणि २५ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या प्रशासन भवनाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. आतील रंगरंगोटी, फर्निचर आदी तत्सम कामे शिल्लक असुन ही कामे येत्या तीन चार महिन्यांत पूर्ण करून नवीन वर्षातच नव्या प्रशासन भवनात उनपचे कामकाज सुरू करण्यात येईल असा विश्वास नवनियुक्त मुख्याधिकारी समीर जाधव यांनी व्यक्त केला आहे.
शहरात होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी रखडलेल्या उनपच्या बायपास रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.यासाठी या आरक्षित रस्त्यांसाठी असलेली जागा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ताब्यात घेण्यात येणार आहे.उरण शहरवासीयांसाठी वैशिष्ट्ये पुर्ण योजनेतून २० कोटी खर्चाचे आणि सुमारे दोन लाख चौरस फूट क्षेत्रात अद्यावत टाऊन हॉल, मल्टी फ्लेक्स, शॉपिंग सेंटर, करमणूकीसाठी नाट्य, चित्रपटगृह उभारण्यात येत आहे.तळमजला अधिक दोन मजल्यांची इमारतीचे काम २०२५ अखेर पुर्ण करुन लोकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न केला जाईल.
डंपिंग ग्राउंड, सेफ्टीझोन आणि शहरवासीयांना नियमित, पुरेसा पाणी पुरवठा, आरोग्यासाठीही काही उपाययोजना केल्या जातील.शहरातील वाढत्या इमारतींवर करडी नजर ठेवतानाच शहरात कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही नवनियुक्त मुख्याधिकारी समीर जाधव स्पष्ट केले.