पनवेलमध्ये भातकापणीला मध्यप्रदेशाचे मजूर
By वैभव गायकर | Published: October 25, 2023 04:41 PM2023-10-25T16:41:04+5:302023-10-25T16:41:46+5:30
पनवेल तालुक्यात अंदाजे 8268 हेक्टवर भातशेती करण्यात आली आहे. बहुतांशी भागात भात कापणीला वेग आलेला दिसून येत आहे.
पनवेल - प्रतिवर्षी भात कापणी सुरू असतानाच अवेळी पाऊस आपला रंग दाखवतो, यामुळे उभ्या भातपिकांवर पाणी फिरते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी पनवेल तालुक्यात शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील पळस्पे याठिकाणी कापणीला थेट मध्यप्रदेशातील मजुर आले आहेत.
पनवेल तालुक्यात अंदाजे 8268 हेक्टवर भातशेती करण्यात आली आहे. बहुतांशी भागात भात कापणीला वेग आलेला दिसून येत आहे.पनवेल तालुक्याला जुलै महिन्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. यावेळी 115 गावातील 978 हेक्टरवरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते .अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. काही प्रमाणात लागवड झालेली शेती या पुराच्या पाण्यामुळे धुपून गेली.
भात गौरी- गणपतीच्या सणामध्ये तयार होण्यास सुरुवात होते, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर याची कापणी होते.परतीच्या पावसाचा फटका भातशेतीला बसण्याची शक्यता असल्याने शेतीमध्ये आजही तुंबलेले पाणी, कापणीनंतर भात सुकवणीचा प्रश्न तसेच मजुरांचा प्रश्न यामुळे कापणीला सुरुवात करण्यात आली आहे.मध्यंतरी भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारतर्फे पंचनामे करण्यात आले मात्र कोणतीही भरपाई मिळू शकली नसल्याचे पळस्पे येथील शेतकरी कमलाकर भगत यांनी सांगितले.
पनवेलचे कृषी अधिकारी तानाजी दौलतोडे यांनी सांगितले की अद्याप केवळ 5 ते 10 टक्केच भातशेतीच्या कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या हवामान खात्याकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन डौलतोडे यांनी केले. मध्यप्रदेशचे मजुर कापणीला मध्यप्रदेशचे मजुर पनवेल मध्ये दाखल झाले आहेत.400 ते 500 रोजंदारीवर हे मजुर काम करीत आहेत.