पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:19 AM2020-01-22T02:19:20+5:302020-01-22T02:21:18+5:30
पेणच्या खारेपाट विभागातील हमरापूर, जोहे, दादर रावे या परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले असून, उत्सवांचे काउंटडाउन सुरू झाले आहे.
- दत्ता म्हात्रे
पेण - मंगळवार, २८ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त माघ महिन्यातील माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले आहेत. पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यातून परिपूर्ण रंगकाम केलेल्या बाप्पाच्या मूर्ती उत्सवमंडपात नेण्यासाठी गणेशभक्तांच्याउत्साहाला उधाण आले आहे. सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्तींचे प्रयाण कार्यशाळांतून होत असून, पेणमधील कार्यशाळांमधून रत्नागिरी व अन्य जिल्ह्यांमध्ये बाप्पाच्या मूर्तींचे प्रयाण सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्वक करण्यात आले.
पेणच्या खारेपाट विभागातील हमरापूर, जोहे, दादर रावे या परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले असून, उत्सवांचे काउंटडाउन सुरू झाले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जो उत्साह गावागावांत निर्माण होणार आहे. त्याच उत्साहाची उधाणभरती २८ जानेवारीला बाप्पाच्या आगमनाने पेणमध्ये होणार असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे. जानेवारी अखेरपर्यंत माघी गणेशोत्सवानिमित्ताने शालेय विविध गुणदर्शन कार्यक्रम, क्रिकेट, कबड्डी सामने, विविध धार्मिक कार्यक्रम, हळदीकुंकू समारंभ, यामध्ये सामाजिक संस्था, युवा मंडळे, महिला मंडळ बचतगट, विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे आयोजित विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय पेणमधील गणेशमंदिरात उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भजन, कीर्तन , धार्मिक पूजापाठ यामुळे भक्तिमय वातावरण निर्मिती अनुभवास मिळणार आहे.
पेण, वडखळ व दादर सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा गणेशोत्सव साजरा होत असल्याने या उत्सवाबरोबरीनेच आंबेघर, कोपर, सोनखार, दादर, वाशी नाका, कोळवे, वडखळ, सिंगणवड, रोडे, मळेघर, गडब, वरसई जिते, बोरगाव, बेलवडे या गावातील गणपती मंदिर व पेण शहरात चिंचपाडा, चावडी नाका, बाजारपेठ, झिराळ आळी या गणपतीमंदिरात माघी गणेश चतुर्थीनिमित्ताने मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे उत्सव साजरा होतो.
दहा फूट उंच गणेशमूर्ती रत्नागिरीला रवाना
पेणमधील कलाकेंद्रातून दहा फूट उंच गणेशमूर्ती रत्नागिरी येथील बाजारपेठ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सोमवारी पेण शहरातून रत्नागिरी येथे नेली असून, या बरोबरच इतर कार्यशाळांमधून मागणी केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे उत्सवमंडपाकडे प्रयाण होत आहे. येत्या चार, पाच दिवसांत बाप्पाच्या मूर्ती मागणीनुसार त्या त्या ठिकाणच्या उत्सवमंडपात दाखल होतील.
पेणमधून १,२०० च्या वर गणेशमूर्तींची मागणी
पेणमध्ये गणेशमूर्ती कारखान्यांची मोठी संख्या असल्याने कार्यशाळांमधून खासगी व घरगुती अशा १,२०० च्या वर गणेशमूर्तींची मागणी माघी गणेशोत्सवानिमित्ताने केलेली आहे.
या व्यतिरिक्त रंगकाम विरहित अशा मोठ्या मूर्तीसुद्धा मुंबई व ठाणे येथे नेण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव व बाप्पाचा आगमन सोहळा नेहमी अबालवृद्धांसाठी आनंद देणारा सोहळा.
मंगळवारी आगमन व प्राणप्रतिष्ठापना हा अंगारकी योग आला असून, त्यासाठीची तयारी व उत्साहाची वातावरणनिर्मिती पेण ग्रामीण परिसरात अनुभवास मिळत आहे.