पेणमध्ये माघी गणेशोत्सवाची धामधूम सुरू, उत्सव मंडपात सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 01:46 AM2021-02-14T01:46:48+5:302021-02-14T01:47:38+5:30
Maghi Ganeshotsav : बाप्पांचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाने सारे वातावरण मंगलमय आणि मंत्रमुग्ध करुन टाकणारे असते. गतवर्षी भाद्रपदात बाप्पांची सेवा करण्याचा व उत्सवाचा आनंद अनुभवता आला नाही.
पेण : माघी बाप्पांचे सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी आगमन होणार आहे. पेणमधील १८४ गावांपैकी खारेपाट विभागातील पश्चिमेकडील तब्बल ९२ गावांमध्ये गणरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील सार्वजनिक व हौसेचे घरगुती बाप्पा गणेश जयंतीच्या दिवशी येणार असल्याने संबंधित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व घरगुती गणेशासाठी मखर, आरास, विद्युत रोषणाई, मंडप सजावट यासाठी उत्साही वातावरणात लगबग सुरू झाली आहे. एकूणच हा उत्साही माहोल पाहता, बच्चे कंपनी व गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पेण ग्रामीण भागात बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंधेला हे चित्र पाहावयास मिळत आहे.
बाप्पांचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाने सारे वातावरण मंगलमय आणि मंत्रमुग्ध करुन टाकणारे असते. गतवर्षी भाद्रपदात बाप्पांची सेवा करण्याचा व उत्सवाचा आनंद अनुभवता आला नाही. कोरोना संसर्गामुळे घरच्या घरी बाप्पांची मानसपूजा झाली. सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवळची जीवलग माणसे कोरोना महामारीला बळी पडत असताना भक्तीमय वातावरणाला अवकळा आली होती. खिन्न वातावरणामुळे हौसमौज करताच आली नव्हती. ही उणीव भरुन काढण्यासाठी आता माघी गणेशोत्सवाला सांस्कृतिक अधिष्ठान या उत्सवांच्या अनुषंगाने मिळणार आहे. भजनी मंडळे सिध्द झाली आहेत. गणेश मंदिरांची रंगरंगोटी झाली आहे.
उत्सव मंडपात सजावट
उत्सव मंडपात सजावट व विद्युत रोषणाईवर अखेरचा हात फिरवला जात असून, ज्या घरात बाप्पांचे आगमन होणार आहे, तेथील सारेजण सजावट करण्यात गुंतले आहेत. पेणमध्ये तब्बल ६००हून अधिक माघी गणरायांचे आगमन होणार आहे.
प्रत्येक गावातील सार्वजनिक व हौसेचे घरगुती बाप्पा गणेश जयंतीच्या दिवशी येणार असल्याने संबंधित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व घरगुती गणेशासाठी मखर, आरास, विद्युत रोषणाई, मंडप सजावट यासाठी उत्साही वातावरणात लगबग सुरू झाली आहे.