अलिबाग - तब्बल शंभरहून जास्त वर्षांपासून चालणारा माघी गणेशोत्सव जय्यत तयारीने साजरा होणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी 58 ठिकाणी माघी गणेसोत्सव साजारा होणार आहे. या उत्सवानिमित्त काही गणेश मंदीरात सत्यनारायण महापूजेचंही आयोजन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे. याबरोबरच कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये कडेकोट पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे.
अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात दिवसभर पूजाअर्चा, भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर सायंकाळी महाप्रसादाची हि व्यवस्था करण्यात आली आहे.
अष्टविनायकांपैकी पालीचा बल्लाळेश्वर व महडचा वरदविनायक ही दोन स्थळे रायगड जिल्ह्यात आहेत. येथील गणेश मंदिरातही भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानातर्फे मंडप घालण्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील सिद्धीविनायक, चिरनेरचा महागणपती, अलिबाग तालुक्यातील नंदूरबाळ, कडावचा बालदिगंबर, जांभुळपाडा येथील सिद्धीगणेश, मुगवलीचा स्वयंभू गणेश अशा प्रमुख मंदिरांमध्येही विशेष सोय करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे लोण आता शहरातून ग्रामीण भागात पोहोचले आहे. मंडळांतर्फेही श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून धार्मिक, सामाजिक उपक्रमही या मंडळांनी हाती घेतले आहेत.