पेण : जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी ३१ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्ताने माघी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. तब्बल पाच दिवस बाप्पांच्या वास्तव्याने माघातला सार्वजनिक माघी गणेशोत्सव रंगणार आहे. यासाठी पेण हमरापूर गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे. पेणच्या दीपक कला केंद्राने या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवड या ठिकाणी तब्बल ३० मोठ्या गणेश मूर्तींची आॅर्डर पूर्ण करून वितरीत सुद्धा केल्या आहेत.दक्षिण रायगडात मंदिरामध्ये तर उत्तर रायगडातील पेण, उरण, खालापूरसह मावळ, पुणे व पिंपरी चिंचवड या ठिकाणी माघी गणेशोत्सव सात-आठ वर्षांपासून लोकप्रिय ठरत आहे. पेणमधील ३० गावातील ३४ हौशी सार्वजनिक मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात, त्याची व्याप्ती दरवर्षागणिक वाढत आहे. बाप्पाच्या आगमनाने माघातल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सध्या सार्वजनिक मंडळांची तरुणाई करीत आहे. पेण खारेपाटातील गावांमध्ये माघी गणरायांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करणारे सार्वजनिक मंडळांना दशकभराचा इतिहास आहे. यावर्षी ३१ जानेवारीला मंगळवारी अंगारक योग आल्याने मंडळाच्या आनंदात भर पडली आहे. कलाग्राम जोहे हमरापूर, कळवे, दादर या पट्ट्यात मंडळाच्या तरुणाईचा उत्साह व गणपती मंडळांची संख्या वाढत आहे. वाशी विभागातील ८ गावे, वडखळ विभागातील १० गावे, हमरापूर विभागातील १० गावांमध्ये सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा होतो. याशिवाय पेण शहरातील गणेश मंदिर, आंबेघर, गणपतीवाडीचा सिद्धी विनायक, कोपर गावचा वरद विनायक, व पेण चिंचपाडा येथील उत्सवाची मोठी तयारी असते.कोपर गावात गणेश जयंतीनिमित्त यात्रा भरते. अशा प्रकारे बाप्पांचा माघातही थाटमाट मोठा असतो. माघातला उत्सव आता वर्षागणिक चांगला बाळसं धरू लागला आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर) -पेणच्या कार्यशाळांमधून १३० गणेशमूर्ती तर हमरापूर पट्ट्यातून १०० च्या आसपास अशा २५० गणेशमूर्ती आकर्षक रंगरुपात व हिरे माणिकात सजवून उत्सवासाठी तयार आहेत. या उत्सवाची खासियत म्हणजे मूर्तिकारांना बाप्पांच्या मूर्तीला सजविण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.च्मंगळवारी ३१ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या माघी गणेशोत्सवाची सांगता रविवारी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
रायगडमध्ये माघी गणेशोत्सवाची धूम
By admin | Published: January 31, 2017 3:36 AM