माघी उत्सव भक्तिमय, मंदिरांत भाविकांची मांदियाळी; जिल्ह्यात ५८ ठिकाणी मोठा गणेशोत्सव
By निखिल म्हात्रे | Published: January 25, 2023 07:02 PM2023-01-25T19:02:23+5:302023-01-25T19:03:45+5:30
अलिबाग कुलाबा किल्ल्याला विद्युत रोषणाई, रंगबेरंगी पताका, आकर्षक रांगाेळ्या काढून भक्तांचा उत्साह द्विगुणित केल्याचे दिसून आले.
- निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध ५८ ठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यात अलिबाग किल्ल्यातील ३५० वर्षांपूर्वीचा आंग्रेकालीन गणेशपंचायतन, पाली येथील बल्लाळेश्वर, खालापूर-महडचा वरदविनायक आणि मुरुड-नांदगावच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरांत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
अलिबाग कुलाबा किल्ल्याला विद्युत रोषणाई, रंगबेरंगी पताका, आकर्षक रांगाेळ्या काढून भक्तांचा उत्साह द्विगुणित केल्याचे दिसून आले. मुंबई, ठाणे, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भरतीच्या कालावधीत भाविकांनी बोटीतून प्रवास करून बाप्पाचे दर्शन घेतले. तर काही भाविकांनी ओहोटी लागल्यावर किल्ल्यात जाणे पसंत केले. मोठ्या संख्येने येथे भाविक दाखल झाल्याने बोट सेवा आणि घोडागाडीला दिवसभर मागणी होती. दर्शनासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मंदिर परिसरामध्ये हार-फुले, पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले नाही. भाविकांमुळे अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गर्दी असल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. त्या ठिकाणच्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्यांनी गजबजून गेले होते.
जिल्ह्यातील अनेक गणेश मंदिरांमध्ये सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले. तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात होता.
महाड, पालीत दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी -
माघी गणेशोत्सवानिमित्ताने महड, सुधागड-पाली येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या नवसाला पावणाऱ्या वरदविनायक व बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातील भक्तांनी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. याच दिवशी उरण, खारपाले, पाबळ-झोपडे येथील मंडळे बल्लाळेश्वराची पालखी घेऊन पायी आले होते. त्या भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. उन्हामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी देवस्थानकडून जागोजागी मंडप उभारण्यात आले होते. माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. दोन दिवसांच्या या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते. या यात्रेत मोठमोठे आकाश पाळणे, फनीगेम, जादूचे प्रयोग, चायनामेड वस्तूंची दुकाने, महिलांना खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंची दुकाने तसेच बच्चेकंपनीसाठी खेळणी व मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. रात्रीच्या वेळेस मंदिराला केलेल्या रोषणाईने बल्लाळेश्वराच्या मंदिराचे दृश्य अगदी डोळ्याचे पारणे फेडून जाणारे असे दिसते.