रायगडमध्ये बाप्पाच्या दर्शनास गणेशभक्तांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:04 AM2018-08-01T03:04:37+5:302018-08-01T03:04:45+5:30
अंगारकी चतुर्थीनिमित्त महड अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता महाआरती झाल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
वावोशी : अंगारकी चतुर्थीनिमित्त महड अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता महाआरती झाल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी २ वाजेपर्र्यंत एक लाखपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती या वेळी मंदिर व्यवस्थापन कमिटी व खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांनी दिली.
दुपारनंतर भाविकांची रांग वाढून महड वळण रस्त्यापर्यंत पोहोचली होती. गर्दीमुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. यासाठी दहा पोलीस कर्मचारी, आठ वाहतूक पोलीस व एका अधिकाऱ्याच्या सहकार्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
महड मंदिरात कडधान्य, विविध प्रकारची फुले वापरून साकारण्यात आलेली भव्य रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली, तसेच संपूर्ण मंदिर परिसरात मन प्रसन्न करणारी फुलांची आरास व सजावट करण्यात आली होती. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महड देवस्थान व्यवस्थापन समितीनेही आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
खोपोलीतील काटरंग येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक व शांतीनगर येथील स्वयंभू श्री ओझा गणेश मंदिर, खालापूर तालुक्यातील विविध गावे व वस्तीतील गणेश मंदिरातही अंगारकीनिमित्त भाविकांची गर्दी झाली. या सर्व ठिकाणी दिवसभर भजन, आरती, महाप्रसाद असे विविध कार्यक्र म मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले.
पालीमध्ये पालखी, पदयात्रा दाखल
राबगाव/पाली : वर्षातील दुसºया अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. अंगारकी चतुर्थीनिमित्त बल्लाळेश्वराची मूर्ती व गाभारा झंडू व इतर फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पालीत महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने गणेशभक्तांची दिवसभरात रेलचेल होती, तसेच या वेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून दर्शनासाठी अनेक भाविक पायी चालत आले होते.
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक पदयात्रा आणि पालख्या घेऊन भाविक दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने आलेल्या भाविकांनी बल्लाळेश्वराच्या चरणी आपले नवस फेडले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवस्थानातर्फे रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व छताची सोय करण्यात आली आहे, तसेच त्यांना शुद्ध थंड पाणी व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनेक भाविक सोमवार रात्रीपासून येथे दाखल झाले होते. देवस्थानच्या दोन भक्तनिवासांमध्ये भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाली पोलिसांनी व बल्लाळेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार व मोटारसायकल पार्किंगसाठी देवस्थानच्या वतीने भक्तनिवास एक येथे व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात हार, प्रसाद, पेढे, पेठा, खेळणी, कडधान्य यांची दुकाने सजली होती.
मुगवलीचा
स्वयंभू गणपती
माणगाव : माणगावजवळील मुगवलीच्या गणपतीचे स्थान हे जागृत म्हणून परिचित आहे. शिवाय भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणूनही ख्याती आहे. या मंदिरात भक्तांची रीघ लागली होती. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून ३ कि. मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथून अवघ्या दीड किमी अंतरावर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे. मुगवली गाव जरी छोटे असले, तर या गणपतीमुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. यामुळेच अंगारकीनिमित्त हजारो भाविकांनी स्वयंभू गणपती दर्शन घेतले.