दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली. जुलै २००५ च्या या नैसर्गिक दुर्घटनेला आज १२ वर्षे पूर्ण होत असली, तरी या काळरात्रीच्या आठवणी आणि जखमा दरडग्रस्तांच्या जीवनात कायम आहेत. मूठभर दरडग्रस्त गावांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसनाचे काम प्रशासनाने राबवले असले, तरी महाड तालुक्यातील सर्वच डोंगराळ गावे आणि गावांतील रहिवासी आजही दरडीच्या छायेत जगत आहेत.जुलै २००५मधील २५ आणि २६ तारीख संपूर्ण महाडकरांना चिरंतन आठवणीत राहील, अशी आहे. या दिवशी दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या चार गावांमध्ये १८२ निष्पाप ग्रामस्थ डोंगरावरून येणाºया दरडीमध्ये गाडले गेले. संपूर्ण महाराष्टÑात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. अवघा महाराष्टÑ प्रलयकारी पुरामध्ये वेढला गेला असल्याने अपेक्षित मदत पोहोचण्यास विलंब झाला. पुराचे पाणी आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर शासन आणि सामाजिक संस्थांनी महाडमधील दरडग्रस्त गावांना मदतीचा हात दिला. दरडीची माती काढणे, वाहून गेलेला रस्ता बनवणे, दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना जेवण, राहणे, कपडे आदी सुविधा पुरवणे यासह दरडग्रस्तांच्या मृतदेहाची योग्य प्रकारे आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे आदी महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. जनकल्याण ट्रस्ट, प्राइड इंडिया, लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट आदी संस्थांनी दरडग्रस्तांना पक्क्या घरांसाठी मदत केली. शासनाने दिलेल्या मदतीच्या आवाहनाला सामाजिक संस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महाडमधील दरडग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक सुविधा मिळाल्या. २००५च्या या दुर्घटनेला आता १२ वर्षे पूर्ण होत आहेत. २५ आणि २६ जुलै २००५मधील दरडग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनाचा आधार मिळाला असला तरी जीवाभावाचे आप्तेष्ट, सगेसोयरे या काळरात्रीने हिरावून नेले याचे दु:ख आजही दरडग्रस्तांच्या मनात जखमांच्या रूपाने जिवंत आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, अशा दरडग्रस्त गावांना सर्वतोपरी मदत दिली. मात्र, दरडीचा धोका डोक्यावर असणारे संभाव्य दरडग्रस्त गाव आजही कायमस्वरूपी पुनर्वसनापासून वंचित आहेत.
महाडमधील डोंगराळ भागांतील गावे दरडींच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:46 AM