महाड दुर्घटना : डीएनए चाचणीमुळे पटली अकरा मृतदेहांची ओळख, मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:37 AM2023-11-11T11:37:09+5:302023-11-11T11:37:17+5:30
तपासणीनंतर ओळख पटल्यानंतर शुक्रवारी त्यांचे ११ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अलिबाग : महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डीएनए चाचणीच्या तपासणीनंतर ओळख पटली असून, या ११ कामगारांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ कामगारांचा मृत्यू व ७ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व ११ कामगारांची डीएनए चाचणी केली होती. तपासणीनंतर ओळख पटल्यानंतर शुक्रवारी त्यांचे ११ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे, खरवली येथील संजय पवार आणि तळीये येथील अक्षय सुतार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कंपनी प्रशासनाकडून ३० लाखांचा धनादेश
चोचिंदे येथील आदित्य मोरे यांचे वडील यांना कंपनी प्रशासनाकडून दिलेला ३० लाखांचा धनादेश तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे, आमदार भरत गोगावले, महाड शहर पोलिस निरीक्षक खोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, युवा सेनेचे महाड तालुकाप्रमुख रोहिदास अंबावले, इम्रान पठाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे
अभिमन्यू भीमरोग उराव, जीवन कुमार चौबे ठाकूर, विकास बहुत महंतो, संजय शिवाजी पवार, अक्षय बाळाराम सुतार, आदित्य मोरे, शशिकांत दत्तात्रय भुसाणे, सोमनाथ शिवाजी वायदंडे, विशाल रवींद्र कोळी, अस्लम महबूब शेख, सतीश बापू साळुंके.