महाड दुर्घटना; १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरू; अजूनही ३ जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:55 AM2020-08-26T01:55:20+5:302020-08-26T06:53:40+5:30

दिवसभरात १२ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले

Mahad Building Collapse; 14 killed, rescue operation resumes after 30 hours | महाड दुर्घटना; १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरू; अजूनही ३ जण अडकल्याची भीती

महाड दुर्घटना; १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरू; अजूनही ३ जण अडकल्याची भीती

Next

आविष्कार देसाई/संदीप जाधव

रायगड/महाड : महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता १४ झाली आहे. ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली होती. दुर्घटनेनंतर रात्री उशिरा आठ जणांना ढिगाºयातून बाहेर काढण्यात आले होते. त्यातील एकाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसºया जखमीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात १२ मृतदेह ढिगाºयाखालून बाहेर काढले.

तारिक गार्डन ही पाच मजल्यांची इमारत सोमवारी संध्याकाळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. या इमारतीमध्ये ४१ सदनिका होत्या. त्यातील १८ सदनिका बंद होत्या, तर २३ सदनिकांमध्ये ८६ रहिवासी राहत होते. ८६ पैकी ६० नागरिक बाहेर गेले होते. त्यामुळे किमान २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. २६ पैकी ११ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. अजूनही तीन जण ढिगाºयाखाली अडकले असण्याची शक्यता आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
महाड इमारत दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या नातेवाइकांना राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपये तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे जखमी झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये आणि संपूर्ण उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

चौकशी समिती नेमली
इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी कोकण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेचे अधिकारी यांची एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मृतांची नावे
सय्यद हनीफ समीर (४५), नविद झमाले (२५), नौशीन नदीम बांगी (३५), आदी शेखनाग (१४), मतीन मुकादम (१७), फातिमा शौकत अलसुलकर (५८), रोशनबी दाऊदखान देशमुख (७०), इसमत हसीम शेखनाग (३५), फातिमा शाफिक अन्सारी (४३), अल्लतीमस बल्लारी (२७), शौकत आदम अलसुलकर (५०), आयेशा नदीम बांगी (७), रुकया नदीम बांगी (२), (एकाची अद्याप ओळख पटलेली नाही)

जखमींची नावे : स्वप्निल शिर्के (२९), नवीद दस्ते (३४), फरीदा शिराज कोर (६५), नमिश शोकत अलसुलकर (२९), संतोष सहानी (२४), जयप्रकाश कुमार (२४), दीपक कुमार (२१), मोहम्मद नदीम बांगी (६), मेहरूनिसा अब्दुल हमिद काझी (७५).

Web Title: Mahad Building Collapse; 14 killed, rescue operation resumes after 30 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.