सिकंदर अनवारे महाड : महाड शहरातील दुर्घटनाग्रस्त तारिक गार्डन इमारतीच्या ढिगाºयाखाली अडकलेल्या एका सहा वर्षांच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. नशीब बलवत्तर म्हणून १७ तासांनंतर मोहम्मदला जीवदान मिळाले आहे, तर १८ तासांनंतर त्याच्या आईचा मृतदेह ढिगाºयाखाली सापडला आहे. मोहम्मदला जीवदान मिळाले असले, तरी मायेच्या आधाराला मात्र पोरका झाला आहे.
मोहम्मद बांगी असे या मुलाचे नाव आहे. ही इमारत २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाºयाखाली हा मुलगा अडकला होता. तब्बल सतरा तासांनंतर मोहम्मद बांगी याला ढिगाºयाखालून सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. मोहम्मद ज्या ठिकाणी सापडला, त्या परिसरात त्याचे कुटुंबही सुखरूप सापडेल, असे बचावकार्य पथकाला वाटले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
मोहम्मद जेथे सापडला त्याच परिसरात अधिक शोध घेतल्यानंतर, त्याच्या आईचा (नौशीन बांगी) मृतदेह बचावकार्य करीत आलेल्या पथकाला सापडला. मात्र, ढिगाºयातून बाहेर काढल्यावर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलगा वाचला, पण त्याची आई त्याला या मातीच्या ढिगाºयाखाली सोडून गेल्याने तो मायेच्या आधाराला मात्र पोरका झाला आहे.मोहम्मद सध्या सुखरूप असून त्याच्यावर महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अगदी लहान वयातच मोहम्मदचे मायेचे छत्र हरवल्याने समाजातून हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे मातीच्या ढिगाºयाखाली तब्बल १७ तास राहूनही आज मोहम्मद जिवंत असल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ हा चमत्कारही पाहावयास मिळाला आहे.पाच जणांवर गुन्हा दाखलमहाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ‘लोकमत’ला दिली. दुर्घटनाप्रकरणी तारिक गार्डन इमारतीचे विकासक फारुक महामुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स तळोजा नवी मुंबई), वास्तुविशारद गौरव शहा (व्हर्टिकल आर्किटेक्ट अँड कन्सल्टन्सी नवी मुंबई), आरसीसी डिझायनर्स बाहुबली टी धावणे (श्रावणी कन्सल्टन्सी मुंबई), महाड नगरपालिके चे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे आणि तत्कालीन नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झुंजाड यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.