आविष्कार देसाई रायगड : ढिगारा उपसताना कोणाचे हात तर कोणाचे पाय दिसत होते... हालचाल दिसल्यावर अथवा आवाज आल्यावर पोकलेन मशीन थांबवायचो... ढिगाऱ्यातून मृतदेहच बाहेर येत होते... किशोर सांगत होता. हाच तो किशोर लोखंडे ज्याने सलग २६ तास पोकलन मशीन चालवून तारिक गार्डन इमारतीचा ढिगारा उपसण्याच्या कामाला वेग दिला.
घटनास्थळी आम्ही तातडीने कामाला सुरुवात केली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार मशीन सुरू करून ढिगारा बाजूला करीत होतो. रात्रभर काम सुरूच ठेवले होते. लक्ष्य होते ते फक्त तातडीने ढिगारा बाजूला करण्याचे. अन्नाचा कणही घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. तब्बल १९ तासांनंतर एक लहान मुलगा जिवंत सापडल्याने आमच्या टीमसह उपस्थितांना आनंदाश्रू आले. त्या मुलामुळे आमची काम करण्याची उमेद वाढली. त्यानंतर, २७ तासांनी वयोवृद्ध महिला मेहरुनिसा काझी सापडल्या. ढिगारा उपसताना मृतदेहांपेक्षा जिवंत माणसे बाहेर काढता आली असती, तर खूप आनंद झाला असता, असे किशोरने सांगितले.‘त्या’ हातांना आमचा सलामकिशोर २४ वर्षांचा असून बीड जिल्ह्यातील उखंडा लिंबडेवी येथील राहणारा आहे. १२वी शिकला आहे. त्रिमूर्ती अर्थ अॅण्ड मूव्हर्स ही कंपनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करते, तेथे किशोर पोकलेन चालवतो. २४ ऑगस्टला मालक सचिन वाघेला यांना फोन आला. त्यांनी इमारत पडल्याचे सांगून तेथे बचाव कार्य करायचे आहे, असे सांगितले. घटनास्थळी माती, विटांचा ढिगारा होता. कामाचे आव्हान होते. तारिक गार्डन इमारत पडल्याने मदतीसाठी किशोरसारखे अनेक हात पुढे आले. जाती-पातीच्या, धर्मभेदाच्या भिंती गळून पडल्या आणि माणसांतील माणुसकीच जिवंत असल्याचे दिसले. किशोरसारख्या असंख्य हातांना आमचा सलाम.एकनाथ शिंदे घेणार ‘त्या’ दोन मुलांचे पालकत्व महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग या दोन लहानग्यांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. या दोन्ही मुलांच्या कुटुंबियांचा इमारतीखाली अडकून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे शिंदे यांनी बुधवारी जाहीर केले आहे. या मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील; तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्त्वानुसार वाटचाल करते आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून मुलांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.