रायगड - महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत कोसळली. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.
पुणे तळेगाव दाभाडे येथून महाडकडे येणाऱ्या एनडीआरएफच्या टीमसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात येऊन कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि रायगड पोलीस यांनी विशेष सतर्कता बाळगली होती. यामुळे रात्री एक वाजून दहा मिनिटांनी NDRF चे पथक महाड येथील दुर्घटना स्थळी पोहोचून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली.
महाड इमारत दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमित शहांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, एनडीआरएफच्या डीजींशी संवाद साधला आहे. दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यात येत आहे. NDRF च्या टीम घटनास्थळी थोड्याच वेळात पोहचून लवकरच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होईल, सर्वाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असं ते म्हणाले आहेत.(Mahad Building Collapse, Raigad)
- रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिकगार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळून काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती.
- जिल्हा प्रशासनाची तात्काळ मदत व बचाव कार्यासाठी तत्परता.
- पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना
- माणगाव,पेण, तळा, पोलादपूर,पनवेल,रोहा,अलिबाग, खोपोली,मुरुड,सुधागड येथून गॅस कटर्स, ॲम्बुलन्स,जनरेटर, जेसीबी, डंपर,डॉक्टर्स, पोकलेन, पाणी,बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर तात्काळ पाठविण्यात आली आहे.
- एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था
- मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती
- जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज.
- पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज.
- रोहा प्रांताधिकारीडॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज
- मदतीसाठी रिलायन्स नागोठणे, पोस्को कंपन्याही सरसावल्या पुढे
- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन
- सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याकडून उद्याच रक्तदान शिबिराचे आयोजन
- जिल्हाधिकाऱ्यांचे तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश
- आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले असून सात जण जखमी तर एकाचा मृत्यू.
- संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे संपूर्ण लक्ष. घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय.
- पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा. मात्र मदत व बचाव कार्य गतीने सुरू ठेवण्यास यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न.
दुर्घटनेत दोघांचा मृत्यू; १८ जण अडकल्याची भीती; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
- इमारत दुर्घटना प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल; डीवायएसपी शशी किरण यांची माहिती
- बिल्डर फारुक काझी फरार झाल्याची स्थानिक आमदार भरत गोगावलेंची माहिती
- माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत; पंतप्रधानांकडून महाड दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त
- मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 9 व्यक्तींना बाहेर काढण्यात यश; त्यापैकी 2 व्यक्तींचा मृत्यू; तर सात व्यक्तींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 5 व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
- जखमी व्यक्तींचा तपशील:-
1)नमिरा शौकत अलसूरकर, वय 19 वर्षे, 2)संतोष सहानी, वय 24 वर्ष, 3)फरीदा रियाज पोरे4)जयप्रकाश कुमार, वय 24 वर्ष, 5)दिपक कुमार, वय 21 वर्षे, 6)स्वप्निल प्रमोद शिर्के, वय 23 वर्ष, 7)नवीद हमीद दुष्टे, वय 32 वर्षे.
- मृत व्यक्तींचा तपशील :- 1)सय्यद अमित समीर,वय 45 वर्ष.
2) नविद झमाले, वय 35 वर्ष
- अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर 18 व्यक्तींचा कसून शोध सुरू
आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले; तीन पुरुष, एका महिलेचा समावेश
- रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू
महाडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या दहावर
आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची महाड दुर्घटनास्थळाला तातडीने भेट, मृतांच्या वारसांना ५ लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्याची वडेट्टीवार यांची घोषणा.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेला तब्बल 26 तासांनंतर वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश