Mahad Building Collapse: मृतांच्या वारसदारांना 5 लाख अन् जखमींना 50 हजारांची मदत देणार; विजय वडेट्टीवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 07:52 PM2020-08-25T19:52:57+5:302020-08-25T20:25:24+5:30
विजय वडेट्टीवार यांनी आज महाड येथे तातडीने जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रायगड- रायगड जिल्ह्यातील महाड येथिल हापूस तलावाजवळ असलेल्या तारिक गार्डन नावाची इमारत सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली. ही माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळताच बचाव कार्यसाठी त्यांनी पुणे येथून एनडीआरच्या तीन तुकड्या तातडीने महाड येथे पाठविले. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या कडून घटनास्थळाची संपूर्ण माहिती घेतली. विजय वडेट्टीवार यांनी आज महाड येथे तातडीने जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
महाड येथे इमारत कोसळलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून झालेल्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली . मृत आणि जखमींना शासणाच्या वतीने तत्काळ मदत जाहीर केली असून जे बेघर झालेत त्यांना त्वरीत निवारा देण्याबाबत निर्देश दिले आहे . #mahadbuildingcollapsepic.twitter.com/rN57TWKP0Z
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 25, 2020
आमदार भारत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती जगताप यांच्या सोबत चर्चा केली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्याच्या वारसदारांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या त्यांचा विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 5 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपयांची मदत विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली. या दुघटनेत किमान 22 जणांचे कुटुंबाची घरे उध्वस्त झालेली असल्याने त्यांना भरीव मदत मिळण्यासाठी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करणार असून त्यांना तातडीने भरीव मदत देण्याचे काम महा विकास आघाडी करणार आहे अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली
सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली. या इमारतीमध्ये 41 कुटुंब राहत होते. त्यातील 18 जणांना बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आणखी काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे.
पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली.
पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे.