महाड/अलिबाग : महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या तिसऱ्या दिवशी १६ झाली. तब्बल ३९ तासांनी एनडीआरएफ जवानांनी शोध आणि बचावकार्य (बुधवारी) थांबविल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दिली. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.
सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३०वा.च्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन ही केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली४५ सदनिकांची पाच मजली इमारत अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. यात एकूण १६ जणांना मृत्यू झाला आहे. घटनेच्या पहिल्या दिवशी सोमवारी रात्री एकाचा मृत्यू झाला होता. मंगळवारी दुसºया दिवशी उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ढिगाºयातून १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाची ओळख पटली नव्हती. आता त्याची ओळख पटली असून मतीन मुकादम (४५) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर बुधवारी हबीबा दाऊद हसवारे (८०), कामरुनीसा अन्सारी (६३) या दोघांचे मृतदेह ढिगाºयात सापडले. या दुर्घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेला जबाबदार धरलेल्या पाच जणांपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने याला पोलिसांनी कळवा येथून बुधवारीसकाळी पावणेपाचच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली. माणगाव न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.‘बिल्डरला फासावर लटकवा’बुधवारी सकाळी या इमारतीमधील वाचलेल्या रहिवाशांनी ढिगाºयात आपल्या घरातील वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून अश्रू आवरता आले नाहीत. संतप्त रहिवासी आणि त्यांच्या नातेवाइकांनी आक्रोश करीत, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरला फासावर लटकवा, अशी मागणी केली.