Mahad Building Collapse: इमारत कोसळली आणि आक्रोश...मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:19 AM2020-08-25T00:19:40+5:302020-08-25T00:20:19+5:30

Mahad Building Collapse Updates: महाडमध्ये स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू, इमारत कोसळली हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Mahad Building Collapse Updates: The building collapsed and there was an outcry | Mahad Building Collapse: इमारत कोसळली आणि आक्रोश...मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावले

Mahad Building Collapse: इमारत कोसळली आणि आक्रोश...मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावले

googlenewsNext

निखिल म्हात्रे

अलिबाग : महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत कोसळली. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली.

इमारत कोसळली हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांचा आक्रोश बघता, जिल्हा प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता, स्थानिकांच्या मदतीने येथे बचावाचे कार्य सुरू करण्यात आले, ते रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. सोमवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत पंधरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली असलेल्या आठ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. यातील काही जणांना शहरातील उपजिल्हा रुग्णालय, तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक इमारत हलायला लागल्याने, काहीतरी धोका असल्याचे समजून इमारतीमधील ३० जण बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, त्यांच्यातील काही जण पडलेल्या इमारतीच्या ढिगाºयाखाली अडकले असल्याने त्यांनी आकांत तांडव सुरू केला होता, पण नागरिकांच्या जमावाने त्यांना शांत केले.

महाड शहरातील काजलपुरा भागात असलेली तारीक गार्डन ही पाचमजली इमारत सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीत ४७ फ्लॅट्स असून, जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी ७० ते ८० रहिवासी इमारतीच्या ढिगाºयाखाली अडकल्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ४० कुटुंबे राहत होती. त्यापैकी २५ कुटुंब बाहेर पडली. मात्र, १५ कुटुंबातील ७० ते ८० जण या ढिगाºयाखाली अडकल्याची शक्यता आहे. बचाव कार्यासाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू असले, तरी मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बचाव कार्य सुरू

  • काही तासांपूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनास आल्याने काही कुटुंबे बाहेर पडल्याचे बोलले जात आहे, तसेच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली असल्याने, मदत कार्यासाठी आलेल्या सरकारी यंत्रणेला तेथे पोहोचणे कठीण झाले होते. त्यामुळे आधी नागरिकांना बाजूला करावे लागले.
  • मदतीसाठी महाड विभागातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी इमारतीचा मलबा काढत असून, माणगाव, श्रीवर्धन येथील अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे, तर अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
  • चार रेस्क्यू टीम कार्यरत आहेत. ढिगाºयाखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचाव काय सुरू होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची माहिती घेतले. स्थानिकांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले.

Web Title: Mahad Building Collapse Updates: The building collapsed and there was an outcry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.