दासगाव : महाडमधील तारिक गार्डन ही इमारत कोसळली आणि नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींच्या बांधकाम गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाडमधील या दुर्घटनेत १६ जणांचा निष्पाप जीव गेला. शिवाय ४१ सदनिकाधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सदनिकाधारकांना शासनस्तरावर न्याय मिळेल का, असा प्रश्न समोर येत आहे.
महाडमधील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही इमारत अवघ्या ७ वर्षांत पत्त्याप्रमाणे कोसळली. यामध्ये ४१ सदनिका होत्या. अनेकांनी रोजीरोटीची पुंजी या घरासाठी लावली होती. आपले कुटुंब शहरात राहून मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहत काहींनी तारिक गार्डनमध्ये घरे घेतली होती. मात्र, या सर्वांची स्वप्ने या दुर्घटनेने भंग झाली. शासनानेही मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना पैसे मंजूर केले. मात्र, बेघर झालेल्या या लोकांना पुन्हा घर मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारत कोसळल्याने ज्यांनी घर म्हणून लाखो रुपये मोजून या सदनिका घेतल्या, त्या सदनिका या दुर्घटनेत जमीनदोस्त झाल्या आणि मोकळी जागा निर्माण झाली. जागा मात्र मूळ मालकाच्या नावावर राहिली. मात्र, सदनिका निघून गेल्याने सदनिकाधारक बेघर झाले आहेत.सदनिकाधारकांचे पुनर्वसन होणार का?महाडमधील तारिक गार्डन इमारत कोसळल्यानंतर अनेक प्रश्नचिन्हे समोर आली आहेत. तारिक गार्डनच्या बिल्डर, आर.सी.सी. कन्सल्टंट, पालिका मुख्याधिकारी, अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांत हे अटकही होतील. मात्र, ज्या सदनिकाधारकांनी आपल्या मेहनतीतून सदनिका खरेदी केल्या होत्या, त्या सदनिकाधारकांचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. या सदनिकाधारकांचे शासन पुनर्वसन करणार का? असा प्रश्नही समोर आहे. ज्या जागेवर ही इमारत होती, त्या जागेचा प्रश्नही आता सदनिकाधारक उपस्थित करत आहेत. शासन नियमानुसार सदनिकाधारकांची सोसायटी आणि अभिहस्तांतरण झाले होते का? याबाबतही चौकशी करून जागेची मालकी ठरविली जाईल.मूळ इमारतीमध्ये होणारे बदल थांबले पाहिजेतइमारतींना पालिका परवानगी देताना शासन नियमानुसार देते. मात्र, अनेक जण इमारत बांधकाम झाल्यानंतर यामध्ये बदल करतात. पार्किंगमधील बांधकामे, टेरेसवर बांधकाम, दुकान गाळ्यात बदल, यामुळे इमारतीच्या मूळ आकारात बदल होत जातात. ही बांधकामे अनधिकृत ठरवली जातात. मात्र, अनधिकृत बांधकाम आहे, तसेच ठेवले जाते. पालिकेच्या यादीत अशा अनधिकृत बांधकामांची नावे वाढत जातात. मात्र, कारवाई शून्य.अनेक इमारतींच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवरमहाड शहराचा विस्तार वाढू लागला आहे. यामुळे नव्याने अनेक इमारती कमी कालावधीत उभ्या राहत आहेत. वारेमाप परवानग्या दिल्या जात असल्याने, बाहेरील बिल्डरही इमारती उभ्या करण्यास पुढे येत आहेत. गेल्या काही वर्षांत महाड शहरात विविध भागात उभ्या राहिलेल्या इमारतींपैकी काही इमारतींचे पिलर खचणे, पिलरवरील सिमेंट आवरण निघून जाणे, अशा घटना समोर आल्या आहेत.याबाबत महाड नगरपालिकेकडे तक्रारीही झाल्या आहेत. आजही याच इमारतींमधून हे नागरिक राहत आहेत. शहरात अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींना महाड नगरपालिकेने धोकादायक इमारती ठरवून नागरिकांना येथून स्थलांतर होण्याचे आदेश दिले आहेत. तारिक गार्डन दुर्घटनेनंतर या इमारतीमधील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.