महाड : सोमवारी सायंकाळी महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळल्यानंतर बचावकार्यात एनडीआरएफसह एल अॅण्ड टी कंपनीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने यासाठी यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. या दुर्घटनेची तीव्रता इतकी भयानक होती की, कोसळलेल्या इमारतीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या रहिवाशांना बाहेर काढणे आणि त्यांना वाचविणे शासकीय यंत्रणेपुढे मोठे आव्हानच होते. मात्र हे आव्हान एल अॅण्ड टी कंपनीच्या यंत्रणेने पेलले आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवले.
सोमवारी ही दुर्घटना घडल्यानंतर पंधरा ते विसाव्या मिनिटांत माजी आमदार माणिक जगताप हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती भयानक असल्याचे त्यांना दिसले. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा बाजूला काढण्याइतकी जवळ असलेली यंत्रणा केवळ एल अॅण्ड टी कंपनाचीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे माणिक जगताप यांनी पहिला फोन केला, तो महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया एल अॅण्ड टी कंपनीचे महाड प्रोजेक्ट मॅनेजर जगद्मोहन नायडू यांना. त्यांनी जगताप यांच्या फोनचे गांभीर्य ओळखून आपली यंत्रसामग्री त्वरित दुर्घटनास्थळी हलवण्याच्या कंपनीच्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या; आणि एका तासात ही यंत्रणा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली.
घटनास्थळी प्रथम दाखल झालेल्या पोकलेन (एक्सव्हेटर्स) मशीनसोबतच स्वत: मॅनेजर जगद्मोहन नायडू हजर झाले. तासा दोन तासांतच एल अॅण्ड टी कंपनीचे ५ पोकलेन मशिन्स, ३ जे सी बी मशीन, १२५ केव्ही जनरेटर, दोन कटर्स, २ हायड्रा , चाळीस फूट ट्रेलर, ६ हॅलोजन एल ई डी (२५० व्हॅट), हायवा डम्पर ५ या यंत्रसामग्रीसह १० तांत्रिक कर्मचारी आणि २५ लेबर्सदेखील घटनास्थळी तैनात झाले. ढिगारा हटविण्याचे व अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चाळीस तासांनंतर संपले असले तरीही गुरुवारी सायंकाळपर्यंत उर्वरित काम पूर्णपणे संपणार असल्याचे नायडू यांनी सांगितले. एल अॅण्ड टीसह दुर्घटनास्थळी ढिगारे हटविण्यासाठी साईश्रद्धा कंस्ट्रक्शन्सचे लक्ष्मण भोसले, मकरंद भागवत, महाड बिल्डर्स असोसिएशन, अंजुमन दर्दमंद ट्रस्ट अशा अनेक व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांनी मदतकार्य केले आहे.