Mahad Building Collaspe: चार वर्षांचा मोहम्मद आई, बहिणींसाठी व्याकुळ; दुर्घटनेत बचावलेल्या चिमुरड्याची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:24 AM2020-08-28T03:24:01+5:302020-08-28T06:52:49+5:30
महाड दुर्घटनेतील ते कुटुंब मंडणगड तालुक्यातील
मंडणगड : इमारत कोसळली अन् त्याची आई, दोन बहिणी यांचा मृत्यू झाला. तोही तेथेच होता. तब्बल १९ तास मातीच्या ढिगाऱ्याखाली राहूनही तो बचावला. पण आज तो व्याकुळ आहे आपल्या आईला व बहिणींना पाहण्यासाठी. त्या आहेत कुठे, त्या दिसत का नाहीत, असे प्रश्न त्याला पडत आहेत आणि त्याची उत्तरे कोणाकडेच नाहीत. महाडच्या इमारत दुर्घटनेत बचावलेल्या मोहम्मद बांगी या चार वर्षांच्या चिमुरड्याची ही कथा.
महाडमधील इमारत दुर्घटनेत मोहम्मदची आई नौशिन बांगी, त्यांची सहा वर्षाची मुलगी आयशा, दोन वर्षाची रूकिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे बांगी कुटुंब मूळचे मंडणगड तालुक्यातील वेसवी या गावचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून ते महाडमध्ये वास्तव्यास आहेत. मोहम्मदचे वडील नदिम बांगी नोकरीसाठी परदेशात असतात. नौशिन यांची बहीण शाहीन परकार आणि त्यांची तीन मुले हेही त्यांच्यासोबत राहतात. ईद झाल्यावर नौशिन आपल्या तीनही मुलांसोबत महाडला गेल्या. मंगळवारी एक नातेवाईक परदेशी जाणार होते. त्यांच्यासोबत पतीला काही खाणे देण्यासाठी नौशिन काम करत होत्या आणि त्याचवेळी त्यांची इमारत कोसळली. नौशिन, आयशा आणि रूकिया या तिघींचाही त्यात मृत्यू झाला. चार वर्षांचा मोहम्मद मात्र त्यात बचावला. १९ तास तो मातीच्या ढिगाºयाखाली राहिला होता आणि तरीही तो बचावला.मोहम्मदचे वडील परदेशातून परत आले असून, वेसवी येथे नौशिन, आयशा, रूकिया यांच्यावर गावीच अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहम्मदच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला सहा टाके पडले आहेत.
गाडी न मिळाल्याने परकार कुटुंब बचावले
मंडणगड तालुक्यातील पेवे गावातील रहिवासी आणि नौशिन यांची बहीण शाहिन परकार यांचे कुंटुंबही त्याच इमारतीत होते. ईदसाठी ते सर्व गावी आले होते. सोमवारी ते महाडला परत जाणार होते. मात्र काही कामानिमित्त घरातील गाडी उपलब्ध नसल्याने त्या सोमवारी महाडला जाऊ शकल्या नाहीत. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे प्राण वाचले.
‘आरोपी लवकरच सापडतील’
तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दोषींपैकी एकाला रायगड पोलिसांनी २६ आॅगस्ट रोजी अटक केली. तर अन्य चार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. लवकरच विकासकासह अन्य आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ‘लोकमत’ला दिली.