महाड : पोलीस असल्याची बतावणी करीत महामार्गावरील इसाने कांबळे गावानजीक एका कपडे आणि कापडी साहित्याच्या शोरूमवर सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून कामगारांना मारहाण करून दोन लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला.इसाने कांबळे गावानजीक सत्य महासेल बाजार हा तयार कपडे त्याचप्रमाणे चादरी, पडदे वगैरे कापडी साहित्याचे शोरूम आहे. मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास सहा जणांचे एक टोळके या शोरूमच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत घुसले. येथे राहणारा एक कामगार नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेला असल्यामुळे खोलीचा दरवाजा उघडाच होता. आत गेल्यानंतर आम्ही पोलीस असल्याचे सांगत या टोळक्याने मॅनेजर अनिलकुमार जिंदाल, सेल्समन इतियास अब्दुल रज्जाक मुकादम आणि वॉचमन सहदेव शिंदे या तिघांना मारहाण करीत त्यांच्याजवळ असलेले २५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना घेऊन ते गोदामात असलेल्या मालकाच्या रूममध्ये गेले. मालकाच्या खोलीतील कपाटाची चावी या तिघांकडून जबरदस्तीने घेत त्यांनी या कपाटातील १ लाख १० हजार आणि १ लाख १७ हजार रुपयांची रक्कम घेत या तिघांनाही बांधून ठेवत पोबारा केला. या प्रकरणी इलियास अब्दुल रज्जाक मुकादम याने एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.या घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक पारसकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील आदींनी घटनास्थळी भेटदिली.
महाड शहरानजीक शोरूमवर मध्यरात्री दरोडा, कामगारांना मारहाण करून अडीच लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:23 AM