महाड : महाड शहराच्या ४८ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजना तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासह कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांबाबत पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात आली. नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहरातील प्रमुख रस्त्यालगत तसेच गटारे व नाल्यावर केलेली बेकायदा अतिक्रमणे हटविण्यासाठी येत्या काही दिवसात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी सांगितले.या सभेत चवदार तळे येथील डॉ. आंबेडकर सभागृहाचे व परिसराचे सुशोभीकरण, क्रांतिस्तंभासमोरील राजर्षी शाहू महाराज सभागृहाचे नूतनीकरण, रमाबाई विहार इमारतीचे नूतनीकरण दस्तुरी नाका येथील रंगूमाता अपार्टमेंट ते मुख्य नाल्यापर्यंत आरसीसी गटार बांधणे, भीमनगर येथील रस्ता डांबरीकरण करणे, सरेकर आळीतील रस्त्यालगतची गटारे बुजवून भुयारी गटार बांधणे, भोईघाट येथे नवीन पुलाचे बांधकाम करणे आदि कामांना या सभेत मंजुरी देण्यात आली. शहरातील अपंग लाभार्थींना तीन टक्के राखीव निधीतून प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा ठरावही यावेळी एकमताने केला. या सभेत घनकचरा संकलन, मोकाट गुरे, भटकी कुत्री आदि विषयांवर ही चर्चा करण्यात आली. या सभेत सत्ताधारी पदाधिकाºयांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता शशिकांत दिघे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.
महाड शहराच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:16 AM